पूरस्थिती निर्माण होण्यापासून थांबवणार; नदीपात्रातील जुने बंधारे पुणे महापालिका काढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 11:45 IST2025-01-09T11:45:08+5:302025-01-09T11:45:23+5:30

जुन्या बंधाऱ्यांची उपयुक्तता संपल्याने गाळ साठून राहात असून धरणातील विसर्गानंतर पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होतोय

To prevent flooding; Pune Municipal Corporation to remove old embankments in riverbed | पूरस्थिती निर्माण होण्यापासून थांबवणार; नदीपात्रातील जुने बंधारे पुणे महापालिका काढणार

पूरस्थिती निर्माण होण्यापासून थांबवणार; नदीपात्रातील जुने बंधारे पुणे महापालिका काढणार

पुणे: शहरातील नदीपात्रात अनेक ठिकाणी जुने, कालबाह्य बंधारे आहेत. त्यांचा आता वापर होत नसून, त्यामुळे गाळ साठून धरणातून पाणी सोडल्यानंतर पूरस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे पालिका हे बंधारे काढून टाकणार आहेत.

शहरातून वाहणाऱ्या मुळा मुठानदीत वृद्धेश्वर सिद्धेश्वर घाट, डेंगळे पूल, शिवणे, खडकी, सांगवी आदी ठिकाणी जुने बंधारे आहेत. त्यांचा आता कोणत्याही प्रकारे वापर होत नाही किंवा त्यांची उपयुक्तताही संपली आहे. मात्र, त्यामुळे गाळ साठून राहात असून, धरणातील विसर्गानंतर पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे हे बंधारे उभारलेल्या संस्थांशी पत्रव्यवहार करून जलसंपदा विभागाशी चर्चा करून पालिका स्वखर्चाने हे बंधारे काढून टाकणार आहे. याशिवाय पाण्याच्या प्रवाहाला अडथळा ठरणारी नदीपात्रातील झुडपेही काढून टाकण्यात येतील. त्या संदर्भात जलसंपदा विभागाशी चर्चा केली जाईल, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी सांगितले.

तलावातील गाळ काढण्यासाठीच्या निविदांवर कार्यादेश काढण्याचे आदेश

कात्रज, जांभूळवाडी आणि पाषाण या तिन्ही तलावांतील गाळ काढण्यासाठीच्या निविदांवर कार्यादेश काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. शहरातील सांडपाणी वाहिन्यांच्या देखभाल दुरुस्तीचा आढावा घेण्यात आला. काही प्रभागात कमी तर काही प्रभागात अधिक काम झाल्याचे समोर येत आहे. मात्र, किमान आवश्यक कामांचे प्रमाण निश्चित करण्यात आले आहे. तेवढी कामे होणे आवश्यक असल्याची सूचना सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. नाल्यांना जोडणाऱ्या पावसाळी वाहिन्या, तुटलेले चेंबर दुरुस्त करण्यात येत आहेत, असे पृथ्वीराज बी.पी. यांनी सांगितले.

Web Title: To prevent flooding; Pune Municipal Corporation to remove old embankments in riverbed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.