ब्लॅकमेलिंगच्या त्रासाला कंटाळून व्यावसायिकाने उचलले टोकाचे पाऊल

By नितीश गोवंडे | Published: March 20, 2024 03:27 PM2024-03-20T15:27:29+5:302024-03-20T15:27:50+5:30

व्यावसायिकाला ब्लॅकमेल करुन वेळाेवेळी पैशाची मागणी करुन जबरदस्तीने १३ लाख रुपये घेतले

Tired of blackmailing, the businessman took extreme steps | ब्लॅकमेलिंगच्या त्रासाला कंटाळून व्यावसायिकाने उचलले टोकाचे पाऊल

ब्लॅकमेलिंगच्या त्रासाला कंटाळून व्यावसायिकाने उचलले टोकाचे पाऊल

पुणे: एका व्यावसायिकाने ओळखीच्या महिलेला मोबाइलवर केलेल्या मेसेजच्याआधारे संबंधित महिला व तिच्या पतीने व्यावसायिकाला ब्लॅकमेल करत त्याच्याकडून १३ लाख रुपये उकळले. तसेच आणखी पैशाची मागणी संबंधित दाम्पत्य करत असल्याने या त्रासाला कंटाळून अखेर व्यावसायिकाने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अशाेक जाेशी (३८, रा. नऱ्हे, पुणे) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.

याप्रकरणी वैष्णवी गणेश चव्हाण (२६) व गणेश चव्हाण (२८, दाेघे रा. खैरेवाडी, विद्यापीठ राेड) यांच्यावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १३ जानेवारी ते २१ फेब्रुवारी दरम्यान घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. याबाबत आराेपी विराेधात गाेपाल कांजी भाई जाेशी (३३) यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार गाेपाल जाेशी यांचा भाऊ मयत अशाेक जाेशी याने वैष्णवी चव्हाण हीच्या व्हाॅट्सअप वर मेसेज पाठवला हाेता.

त्याआधारे महिलेने अशोक जोशी यांच्याविरोधात पोलिसात तक्रार करण्याची वारंवार धमकी दिली. संबंधित आराेपी दाम्पत्याने मयत अशाेक यास ब्लॅकमेल करुन वेळाेवेळी पैशाची मागणी करुन जबरदस्तीने १३ लाख रुपये घेतले. परंतु त्यानंतरही त्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी पुन्हा अशाेक याच्या ऑफिसवर जात त्यांना पोलिसांत तक्रार करण्याची धमकी देऊन त्यांना पुन्हा ब्लॅकमेल करुन पैशांची मागणी केली. या त्रासाला कंटाळून अशोक यांनी विषारी औषध पिल्याने त्यांचा मृत्यू झाला, अशी फिर्याद जोशी यांनी दिली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विशाल पाटील करत आहेत.

Web Title: Tired of blackmailing, the businessman took extreme steps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.