जेजुरी : जेजुरी येथील एका हॉटेलचालकाने खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस आणि नातेवाइकांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत पीडित व्यक्तीला खासगी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून, प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. ही घटना मंगळवारी (दि. २४) सकाळचे सुमारास जेजुरी येथील एका हॉटेलच्या खोलीमध्ये घडली असून रवींद्र ऊर्फ बाळासाहेब दत्तात्रय पारखे (वय ६५) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पीडित व्यक्तीचे नाव आहे. विषारी द्रव्य प्राशन करण्यापूर्वी त्यांनी ‘सुसाइड नोट’ तयार करून त्यामध्ये सर्व खासगी सावकारांच्या नावासह दिलेले व्याज व मुद्दल रकमेसह आदी माहिती नातेवाईक व प्रसार माध्यमावर पाठवली होती.
पारखे यांचा मुलगा रोहित रवींद्र पारखे यांनी पोलिसांना दिलेला मजकूर व पीडित व्यक्तीची सुसाइड नोट वरून पोलिसांनी सासवड व जेजुरी येथील सात जणांविरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियम ३९,४५,४६ बीएनएस ३०८ (२) ३०९ (४) ३५२,३५१(२) (३)(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे मोहन ज्ञानदेव जगताप, अक्षय (शिटू) चंद्रकात चौखंडे, संभाजीराजे विश्वासराव जगताप, गिरीश राजेंद्र हाडके अक्षय (बाबू) महादेव इनामके (सर्व रा. सासवड) अनिल वीरकर, पंकज निकुडे (रा. जेजुरी) आदींवर जेजुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून यापैकी मोहन जगताप, संभाजी जगताप, अक्षय (शिटू) चौखंडे, यांना मंगळवारी (२४) रात्रीच्या सुमारास अटक केली आहे. बुधवारी (दि. २५) तिघांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
तसेच व्याजाच्या रकमेपोटी सासवड येथील आरोपीने पीडित व्यक्तीच्या मालकीचे हिसकावून घेतलेले चारचाकीवाहन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, खासगी सावकारी करणाऱ्या आरोपींकडून पारखे यांनी मोठ्या रकमा ५ ते १० टक्क्यांनी घेतल्या होत्या. त्यापोटी त्यांनी मुद्दल रकमेपेक्षा दुप्पट तिप्पट व्याज भरूनही घेतलेली रक्कम जागेवरच होती व्याज व मुद्दल भरता येणे शक्य नसल्याने खासगी सावकारांच्या जाच दमदाटी, शिवीगाळ व मानसिक त्रासाला कंटाळून आपले जीवन संपवत असल्याचे पारखे यांनी ‘सुसाइड नोट’मध्ये नमूद केले आहे. सदरील नोट प्रसारमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात फिरल्याने आमदार विजय शिवतारे, राज्याचे मुख्यमंत्री कार्यालय, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारे आदींनी यामध्ये सक्त कारवाईचे आदेश दिले. ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलिस अधीक्षक गणेश बिराजदार, उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी तातडीने गुन्हा दाखल करीत तीन जणांना अटक केली असून, उर्वरित आरोपीना अटक करणार असल्याचे वाकचौरे यांनी सांगितले.
गेली अनेक वर्षे पुरंदर तालुक्यातील सर्वसामान्य व्यापारी, कामगार व शेतकऱ्यांना खासगी सावकारांचा सुळसुळाट झाला आहे. केवळ व्याजाच्या रकमेपोटी काही जणांच्या जमिनी बळकावण्यात आल्या आहेत. याबाबत कडक धोरण राबविण्यात येणार आहे. पीडित नागरिकांनी निर्भयपणे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल कराव्यात किंवा माझ्याशी संपर्क करावा कोणत्याही स्वरूपाच्या दबाव व दहशतीला बळी पडू नये, असे आवाहन आमदार विजय शिवतारे यांनी केले आहे.