सावकारांच्या छळाला कंटाळून तरुण व्यावसायिकाने उचलले टोकाचे पाऊल; ५० लाख मुद्दल देऊनही ६० लाख व्याज वसूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 10:51 IST2026-01-30T10:50:56+5:302026-01-30T10:51:18+5:30
आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवत ३ गुंठे जमीन साठेखत व कायमस्वरूपी कुलमुखत्यारपत्राद्वारे नातेवाईकाच्या नावावर करून घेतली

सावकारांच्या छळाला कंटाळून तरुण व्यावसायिकाने उचलले टोकाचे पाऊल; ५० लाख मुद्दल देऊनही ६० लाख व्याज वसूल
उरुळी कांचन :उरुळी कांचन परिसरात बेकायदेशीर सावकारी, मारहाण, अपहरण व बंदुकीचा धाक दाखवून जमीन नावावर करून घेण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी उरुळी कांचन पोलीस स्टेशनमध्ये चार जणांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार महादेव विठ्ठल जरांडे (वय ३६, व्यवसाय – जुने चारचाकी वाहन खरेदी-विक्री) यांनी दिलेल्या जबाबानुसार, आरोपी आनंता पवार व माऊली पवार यांनी व्यवसायात गुंतवणुकीच्या नावाखाली मोठ्या रकमा दिल्या. मात्र, त्यावर दरमहा ८ ते १० टक्के इतक्या अवाजवी व्याजदराने वसुली करण्यात आली.
तक्रारदाराकडून एकूण ५३ लाख ८९ हजार रुपये मुद्दल घेतल्यानंतरही आरोपींनी ११ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ६० लाख ४१ हजार रुपये व्याज वसूल केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याशिवाय, व्याज न दिल्यास दबाव टाकत विक्रीसाठी ठेवलेल्या १२ जुन्या चारचाकी गाड्या ओढून नेण्यात आल्या. डिसेंबर २०२५ मध्ये आरोपींनी तक्रारदारास मारहाण करून जबरदस्तीने कुंजीरवाडी येथे नेले. तेथे बंदुकीचा धाक दाखवत, कोरेगाव मूळ येथील ३ गुंठे जमीन साठेखत व कायमस्वरूपी कुलमुखत्यारपत्राद्वारे आरोपींच्या नातेवाईकाच्या नावावर करून घेण्यात आली. संबंधित व्यवहारात कोणताही धनादेश प्रत्यक्षात देण्यात आलेला नसल्याचा आरोप आहे.
सततच्या मानसिक, आर्थिक व शारीरिक छळामुळे तक्रारदाराने २६ जानेवारी २०२६ रोजी विषारी औषध प्राशन केल्याचा गंभीर प्रकारही उघडकीस आला आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, शुद्धीत असताना दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी आनंता पवार, माऊली पवार, दिपाली साळुंखे व विजय पांडुरंग गोते यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता, शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम अंतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास उरुळी कांचन पोलीस करत आहेत.
याप्रकरणी २९/१२/२०२५ रोजी व्यावसायिकाने उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड बापूराव दडस यांच्याकडे तक्रारी अर्ज केला होता. त्याच अनुषंगाने उरुळी कांचन पोलिसांकडे तो अर्ज चौकशीसाठी आला होता. लवकरात लवकर कारवाई झाली असती तर माझ्या पतीने विष प्राशन केले नसते अशी प्रतिक्रिया तक्रारदाराच्या पत्नीने व्यक्त केली.