कुंभमेळयाला नियमानुसार तिकीट दराची आकारणी; मग साहित्य संमेलनाला सापत्न वागणूक का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 09:25 IST2025-01-22T09:24:56+5:302025-01-22T09:25:14+5:30

एकीकडे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला; मात्र मायमराठीच्या उत्सवाला मिळणाऱ्या या सापत्न वागणुकीमुळे काहीसे नाराजीचे वातावरण

Ticket prices for Kumbh Mela are charged as per rules; then why the literary festival is treated with contempt? | कुंभमेळयाला नियमानुसार तिकीट दराची आकारणी; मग साहित्य संमेलनाला सापत्न वागणूक का?

कुंभमेळयाला नियमानुसार तिकीट दराची आकारणी; मग साहित्य संमेलनाला सापत्न वागणूक का?

पुणे: राजधानी दिल्लीमध्ये ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा सोहळा रंगणार असताना संमेलनापूर्वीच काहीसा नाराजीचा सूर उमटण्यास सुरुवात झाली आहे. कुंभमेळा व सणासुदीच्या वेळी रेल्वे बोर्डाकडून जादा रेल्वेगाड्या सोडण्यात येतात आणि नियमानुसार तिकीट दर आकारले जातात . मग साहित्य संमेलनासाठी पुण्यातून सोडण्यात येणाऱ्या विशेष रेल्वेसाठी ज्यादा दराने आकारणी का? असा सवाल साहित्य क्षेत्रातून उपस्थित केला जात आहे. एकीकडे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला; मात्र मायमराठीच्या उत्सवाला मिळणाऱ्या या सापत्न वागणुकीमुळे काहीसे नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। अशी अमृतवाणी ज्ञानदेवांच्या प्रत्येक शब्दाशब्दांतून व्यक्त झाली आणि जणू ब्रह्मविद्याच शब्दरूप झाली. या मायमराठीचा कौतुक सोहळा वर्षानुवर्षे भारतातील अनेक प्रांतात अभिमानाने साजरा केला जातो. संमेलन हा त्याचाच एक अंश. यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे दिल्लीत होत आहे. मराठीला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्यात आल्याने एकीकडे मराठी जनांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, तर दुसरीकडे रेल्वे मंत्रालयाकडून दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी सोडण्यात येणाऱ्या विशेष रेल्वेसाठी तिप्पट दर आकारले जात असल्याच्या संयोजकांच्या सांगण्याने आनंदात काहीसे विरजण पडले आहे. ही विशेष रेल्वे गाडी फुल्ल ट्रॅफिक रेट (एफटीआर) या नियमानुसार बुक करण्यात आली असून, ही रेल्वे एफटीआर योजनेमध्ये असल्याने तिप्पट तिकीट दर आकारणी करण्यात आली असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र त्या अतिरिक्त तिकिटाचा भार संयोजकांवर पडणार आहे. यामुळे साहित्य क्षेत्रातून नाराजीचा सूर उमटला आहे. इतर वेळी रेल्वे बोर्डाकडून सण, उत्सव, अयोध्यावारी यासाठी विशेष रेल्वे सोडण्यात येतात. मग साहित्य संमेलनाला ही दुय्यम वागणूक का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

घुमानला होती फ्री रेल्वे

सन २०१४ मध्ये मराठी साहित्य संमेलन पंजाब राज्यातील घुमान येथे झाले होते. दरम्यान, तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पुणे आणि नाशिकमधून साहित्य आणि रसिकांसाठी मोफत रेल्वेची सुविधा उपलब्ध करून दिली होती.

साहित्य संमेलनाला मराठी साहित्यिक आणि रसिकाला दिल्लीला जाण्यासाठी फुल्ल ट्रॅफिक रेट (एफटीआर) या योजनेमध्ये रेल्वे बुक करण्यात आली आहे. यामध्ये स्लीपर गाडी असून, पॅन्ट्री कारसह १८ डब्यांची गाडी आहे. रसिकांच्या सोयीसाठी संयोजकांकडून तिकिटाव्यतिरिक्त इतर खर्चापोटी रेल्वेचा होणारा जादा खर्च भरण्यात येणार आहे. -संजय नहार, संयोजक, ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, दिल्ली

Web Title: Ticket prices for Kumbh Mela are charged as per rules; then why the literary festival is treated with contempt?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.