‘ती बस’ मोबाइल टॉयलेट वापरण्यासाठी महिलांकडून आकारणार शुल्क, पुणे महापालिकेचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 18:05 IST2025-02-02T18:00:43+5:302025-02-02T18:05:50+5:30

महापालिकेने पीएमपीच्या सेवेतून बाद झालेल्या बसचा वापर महिलांसाठी मोबाईल टॉयलेटसाठी करण्याचा निर्णय घेतला

Ti Bus toilet for women is no longer free; charges will apply for use | ‘ती बस’ मोबाइल टॉयलेट वापरण्यासाठी महिलांकडून आकारणार शुल्क, पुणे महापालिकेचा निर्णय

‘ती बस’ मोबाइल टॉयलेट वापरण्यासाठी महिलांकडून आकारणार शुल्क, पुणे महापालिकेचा निर्णय

- हिरा सरवदे

पुणे :
पुणे महापालिकेने शहरातील गर्दीच्या विविध अकरा ठिकाणी पीएमपीएमएलच्या जुन्या बसेसचा वापर करून महिलांसाठी ‘ती बस’ मोबाईल टॉयलेट सुरू करण्यात आली होती. ११ पैकी सध्या केवळ तीनच बसचा वापर सुरू आहेत. त्यामुळे ही बंद पडलेली मोबाईल टॉयलेट सुरू करण्यात येणार आहे. या सेवेचा वापर करणाऱ्यांकडून पाच रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

महापालिकेने पीएमपीच्या सेवेतून बाद झालेल्या बसचा वापर महिलांसाठी मोबाईल टॉयलेटसाठी करण्याचा निर्णय घेतला होता. गर्दीच्या ११ ठिकाणी प्रत्येकी चार सीटची सुविधा असलेल्या या बस ठेवण्यात आल्या होत्या. पाण्याची आणि ड्रेनेजची सुविधा उपलब्ध होईल, अशा ठिकाणी या बस उभ्या करण्यात आल्या होत्या. सीएसआरच्या माध्यमातून या बसेसची देखभाल दुरुस्ती करण्यात येत होती परंतु, नंतर टप्प्याटप्प्याने ११ पैकी ८ बसची सेवा बंद करून त्या हलविण्यात आल्या. सध्या जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी उद्यानाच्या आवारात, शनिवारवाडा आणि जिल्हा न्यायालयाजवळ या तीन बसचा वापर मोबाईल टॉयलेटसाठी सुरू आहेत.

निधीअभावी बंद पडलेल्या या बस पुन्हा सुरू करण्यासाठी महापालिकेच्या घनकचरा विभाग प्रयत्न करत आहे. यासाठी पाच वर्षे देखभाल दुरुस्तीची निविदा काढली आहे. त्यासाठी ५० लाख रुपये खर्च येणार आहे. महापालिकेकडून दिली जाणारी ही सेवा आतापर्यंत मोफत होती परंतु आता ही सेवा सुरू करताना त्यासाठी पाच रुपये शुल्क आकारले जाणार आहे, असे घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम सांगितले.

बसवर जाहिरातीचे अधिकार मिळणार
‘ती बस’ मोबाईल टॉयलेट देखभाल दुरुस्ती करणाऱ्या संस्थेला या बदल्यात संबंधित बसवर जाहिरातीचे अधिकार तसेच बसमध्येच एकाबाजूला पॅकेज फूड विक्रीचीदेखील सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

Web Title: Ti Bus toilet for women is no longer free; charges will apply for use

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.