दिवसा उन्हाचा चटका अन् रात्री कडाक्याची थंडी; वातावरण बदलामुळे घशात संसर्ग, श्वसनाच्या वाढल्या तक्रारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 13:43 IST2026-01-25T13:42:49+5:302026-01-25T13:43:08+5:30
- दिवसा उन्हाचा चटका अन् रात्री गोठवणारी थंडी देतेय आजारांना निमंत्रण

दिवसा उन्हाचा चटका अन् रात्री कडाक्याची थंडी; वातावरण बदलामुळे घशात संसर्ग, श्वसनाच्या वाढल्या तक्रारी
पुणे : शहरात दिवसा जाणवणारा उन्हाचा चटका अन् रात्री अचानक वाढणारी कडाक्याची थंडी यांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होताना दिसत आहे. बदलते हवामान, तापमानातील सततच्या चढ-उतारामुळे नागरिकांमध्ये श्वसनविकारांचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढले आहे. ससून रुग्णालय, कमला नेहरू रुग्णालयासह सरकारी रुग्णालयांमध्ये तसेच खासगी दवाखान्यांच्या बाह्यरूग्ण विभागात श्वसनाचा त्रास जाणवणाऱ्या रुग्णांची संख्या आठवड्याभरात लक्षणीय वाढली आहे. शहरात गेल्या एका वर्षात जानेवारी ते डिसेंबरअखेर तीव्र श्वसनसंसर्ग व इन्फ्लुएन्झासदृश आजारांचे तब्बल ४१ हजार ५१३ रुग्ण नोंदवले गेल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून समोर आली आहे.
सध्या सकाळ-संध्याकाळच्या तापमानात मोठा फरक जाणवत आहे. दिवसा कोरडी आणि उष्ण हवा, तर रात्री थंड व दमट वातावरण निर्माण होत आहे. या बदलांमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन संसर्ग होण्याची शक्यता वाढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणे, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणावर सरकारी तसेच खासगी रुग्णालयांत उपचारासाठी दाखल झाले. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच आधीच मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा यांसारखे दीर्घकालीन आजार असलेले रुग्ण या संसर्गांना अधिक बळी पडत असल्याचे आढळून आले आहे. महाविद्यालये, शाळा, कार्यालये, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि गर्दीची ठिकाणे येथे संसर्ग झपाट्याने पसरत असल्याचेही निदर्शनास आले आहे.
---------
वाढता संसर्ग व बाधणारे आजार
या हवामान बदलाचा विशेष परिणाम लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच दमा, अॅलर्जी, सायनस, ब्राँकायटिससारख्या बाधणाऱ्या आजारांनी त्रस्त रुग्णांवर होत आहे. ओपीडीमध्ये घशात खवखव, कोरडा खोकला, श्वास घेण्यास त्रास अशा तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे.
---------
वाढत्या संसर्गाची कारणे
तापमानातील अचानक बदल. हवेतील आर्द्रतेतील असमतोल. धूळ, प्रदूषण व थंड पेये, उघड्यावर थंड हवेत जाणे. अपुरी विश्रांती व कमी पाणी पिणे.
-----------
आजाराची लक्षणे
घशात खवखव किंवा दुखणे. सर्दी, नाक वाहणे. कोरडा किंवा कफयुक्त खोकला. श्वास घेताना घरघर, डोकेदुखी, अंगदुखी, थकवा.
----------
संसर्गावर उपाय
कोमट पाणी पिणे. वाफ घेणे व मीठाच्या पाण्याने गुळण्या करणे. हलका, पौष्टिक आहार घेणे. आवश्यक असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेणे.
-------
काय काळजी घ्यावी
सर्दी-खोकला, ताप किंवा श्वसनास त्रास जाणवल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा, हातांची स्वच्छता राखावी आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळावे. ताप किंवा श्वसनविकाराची लक्षणे असल्यास कामावर किंवा शाळेत जाणे टाळण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. वेळेवर निदान आणि योग्य उपचार केल्यास या आजारांवर प्रभावीपणे नियंत्रण मिळवता येऊ शकते, असे आरोग्यतज्ज्ञांचे मत आहे.
सध्याच्या वातावरणात किरकोळ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. सर्दी-खोकला किंवा श्वसनाचा त्रास दोन-तीन दिवसांपेक्षा जास्त राहिल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा. विशेषतः दमा व अॅलर्जीच्या रुग्णांनी नियमित औषधोपचार सुरू ठेवावेत. - डॉ. संजय गायकवाड, श्वसन विकार तज्ज्ञ, ससून रूग्णालय.