मुंबई-बेंगलोर महामार्गावर 'बर्निंग कार' चा थरार ; मोठा अनर्थ टळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 21:20 IST2021-02-11T21:20:14+5:302021-02-11T21:20:46+5:30
वडगाव पुलावरील घटना; प्रवाशी वेळीच गाडीतून उतरल्याने मोठा अनर्थ टळला

मुंबई-बेंगलोर महामार्गावर 'बर्निंग कार' चा थरार ; मोठा अनर्थ टळला
धायरी : मुंबई - बंगळुरू महामार्गावर मुंबईच्या दिशेकडून कोल्हापूरच्या दिशेकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनाला आग लागली. वाहनांमध्ये असलेल्या सात प्रवाशांनी वेळीच प्रसंगावधान राखून खाली उतरल्याने मोठा अनर्थ टळला . ही घटना गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली.
महिंद्रा कंपनीची झायलो ( क्रमांक MH १४ B A ५६९१) ह्या गाडीचे मालक सौरभ बर्गे हे आपल्या गाडीत अन्य सात सहकाऱ्याबरोबर कोल्हापूरच्या दिशेकडे जात होते. वडगाव पुलावर आल्यानंतर त्यांना समोरील बोनेटमधून धूर निघत असल्याचे दिसून आले. आपल्या गाडीला आग लागत असल्याचे लक्षात आल्याने सावधगिरी बाळगत चालकाने गाडी रस्त्याच्या बाजूला घेऊन उभी केली. यावेळी त्यांच्यासह सात प्रवाशांनी वाहनातून तत्काळ बाहेर धाव घेतली. काही क्षणातच वाहनाने पेट घेतला. सनसिटी व पीएमआरडीएच्या नांदेड सिटी येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी त्वरित धाव घेऊन आग आटोक्यात आणली.
नांदेड सिटी येथील अग्निशमन केंद्रातील अग्निशमन अधिकारी सुजित पाटील व वाहनचालक अभिजित गोणे, फायरमन किशोर काळभोर, प्रसाद जीवडे तसेच सनसिटी येथील अग्निशमन दलाचे पंकज जगताप, शिवाजी मुजमुले, शिवाजी आरोळ, विलास गडशी, संतोष नलावडे यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. राष्ट्रीय महामार्ग पेट्रोलिंग चे अधिकारी अभिजित गायकवाड तसेच कर्मचाऱ्यांनी जळालेल्या वाहनाला क्रेनच्या साहाय्याने बाजूला घेऊन वाहतूक पोलीसांनी वाहतूक सुरळीत केली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नसली तरी गाडी मात्र पूर्ण जळाली आहे.