Women Reservation Bill: पुणे जिल्ह्यातील तीन महिलांना मिळाली होती आमदाराकीची संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 02:36 PM2023-09-21T14:36:57+5:302023-09-21T14:45:18+5:30

जिल्ह्यामध्ये आतापर्यंत केवळ तीन महिलांनाच आमदारकीची संधी...

Three women from Pune district got the opportunity to become MLAs Women Reservation Bill | Women Reservation Bill: पुणे जिल्ह्यातील तीन महिलांना मिळाली होती आमदाराकीची संधी

Women Reservation Bill: पुणे जिल्ह्यातील तीन महिलांना मिळाली होती आमदाराकीची संधी

googlenewsNext

- दुर्गेश मोरे

पुणे : लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळण्यासाठी नवे विधेयक संसदेत पारित करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत केवळ तीन महिलांनाच आमदारकीची संधी मिळाली असल्याचे समोर आले आहे. १८८५ मध्ये आंबेगाव विधानसभेमध्ये छायाताई पडवळ यांना कॉंग्रेस (आय)ने उमेदवारी दिली; पण यश काही मिळाले नाही. दरम्यान, दौंड विधानसभेमध्ये मात्र, उषाताई जगदाळे यांनी दोन टर्म पूर्ण केल्या आहेत.

काल महिला आरक्षणाचे विधेयक मांडले. ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ असे या विधेयकाचे नाव असून या विधेयकाला लोकसभेत बहुतांश पक्षांनी पाठिंबा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात असलेल्या विधानसभांचा आढावा घेतला असता केवळ तीन महिलांनाच आमदारकीची संधी मिळाल्याचे निदर्शनास आले. त्यामध्ये १९६१मध्ये बारामती विधानसभा मतदार संघात काँग्रेसच्या मालतीबाई शिरोळे या विजयी झाल्या होत्या. त्यानंतर १९७२मध्ये उषाताई जगदाळे यांनी दौंड विधानसभेची निवडणूक लढवली. जगदाळे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. त्यांच्याविरोधात आर. बी. ताकवणे होते. २१ हजार ४६५ मतांनी जगदाळे या विजयी झाल्या. त्यानंतर त्यांना १९८५मध्ये काँग्रेस (एस) ने संधी दिली. त्यावेळी त्यांचा मुकाबला हा राष्ट्रीय काँग्रेसचे अशोक खळदक आणि अपक्ष नानासाहेब पवार यांच्याबरोबर होता. त्यामध्येही त्यांनी ३३ हजार ४०८ मते मिळवत विजय खेचून आणला. १९७४ ला जुन्नरचे लता तांबे, तर २००४ मध्ये रंजना कुल यांनी दौंड विधानसभेचे प्रतिनिधित्व केले.

खिलाडीवृत्तीने प्रश्न सोडवले : उषाताई जगदाळे

सन १९७२ आणि १९८५ चा काळात महिलेने विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणे तसे सोपे नव्हते. काही अडचणी आल्या; पण एक महिला म्हणून सर्वांचीच सहकार्याची भूमिका असायची. मग विरोधक असला तरी तो कधीही कमीपणा येऊ देत नव्हता. काही वेळेला आपल्या मतदार संघातील विकासकामे खिलाडूवृत्तीने करून घ्यावी लागत होती. तालुक्यात विकासकामे होत असल्यामुळे जनतेतही समाधानाचे वातावरण असायचे. त्यामुळे राजकारणाबरोबरीने समाजकारणदेखील असायचे, असे माजी आमदार उषाताई जगदाळे यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील महिलांना फायदा

नारी शक्ती वंदन विधेयकाचे खरोखरच मनापासून स्वागत करते. यापूर्वीच या विधेयकाची अंमलबजावणी व्हायला हवी होती. या विधेयकाचा ग्रामीण भागातील स्त्रियांना खूप मोठा फायदा होणार आहे. मी ग्रामीण भागातील दौंड तालुक्याचे विधानसभा सदस्य म्हणून कामकाज पाहिले. जनतेने व कार्यकर्त्यांनी मला भरभरून मदत केली. त्यामुळे संधीचं सोनं करता आलं. आत्तापर्यंत आपल्या देशात राष्ट्रपतिपदावर दोन महिला विराजमान झाल्या. देशातील सर्वोच्च स्थाने पटकावली. खेळ, वैज्ञानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रत्येक ठिकाणी महिला अग्रेसर असते. जुन्या रूढी, परंपरा झुगारून अत्यंत उत्कृष्ट निर्णय घेतला गेला आहे. प्रत्येक वेळी महिलांनी संधीचे सोने केले आहे. मला महिला आमदार म्हणून कोणतीही अडचण आली नाही. उलट विधानसभेत मी मांडलेल्या प्रश्नांचे व मागणीचे कौतुकच केले गेले असल्याचे दौंडच्या माजी आमदार रंजना कुल यांनी सांगितले.

Web Title: Three women from Pune district got the opportunity to become MLAs Women Reservation Bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.