लोणी स्टेशन परिसरात कमरेला पिस्तुल लावून फिरणाऱ्यासह दोन जण पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 12:38 IST2020-05-11T12:36:50+5:302020-05-11T12:38:00+5:30
एक गावठी पिस्तुल,आठ जिवंत काडतुसे व एक रिकामी मॅगझीन जप्त

लोणी स्टेशन परिसरात कमरेला पिस्तुल लावून फिरणाऱ्यासह दोन जण पोलिसांच्या ताब्यात
पुणे : लोणी काळभोरपोलिसांनी गावठी पिस्तुल बाळगण्याप्रकरणी लोणी स्टेशन परिसरातून तिघांना अटक केली.त्यांच्याकडून एक गावठी पिस्तुल,आठ जिवंत काडतुसे व एक रिकामी मॅगझीन जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी फिरोज महंमद शेख (वय२५.रा.घोरपडेवस्ती)आनंद महादेव चव्हाण (वय २३ रा.पठारेवस्ती,कदमवाकवस्ती आणि निलेश नागेश जेटीथोर (वय २२ रा.कदमवस्ती)या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी स्टेशन परिसरात फिरोज महंमद शेख हा त्याच्या दोन मित्रांसह कंबरेला पिस्तुल लावून फिरत असल्याची माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे यांना बातमीदारामार्फत मिळाली.वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांना याविषयी माहिती देऊन ननवरे पोलीस पथकासमवेत लोणी स्टेशन परिसरातील हॉटेल प्यासाजवळ गेले असता त्याठिकाणी तिघेजण संशयितरित्या थांबलेले आढळून आले.
यावेळी पोलिसांची चाहूल लागताच पळून जात असताना पोलिसांनी त्यांना पकडून झडती घेतली असता त्यातील फिरोज महंमद शेख याच्या पॅन्टचे डावे कंबरेस आतील बाजुस खोवलेला एक गावठी पिस्तुल व मॅगझीनमध्ये ५ जिवंत काडतुसे मिळून आली तर सोबत असलेल्या आनंद महादेव चव्हाण याकडे ३ जिवंत काडतुसे मिळून आली.हे गावठी पिस्तुल व काडतुसे यांनी निलेश नागेश जेटीथोर यानें दिले असल्याची माहिती फिरोज शेख व आनंद चव्हाण यांनी पोलिसांना दिली.यांच्याकडून गावठी पिस्तुल, आठ जिवंत काडतुसे व एक मोकळे मॅगझीन असे एकुण २८,६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील,उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे,पो.ना.परशराम सांगळे व लोकेश राऊत यांनी केली.