अनधिकृत बांधकामाची माहिती घेण्यासाठी गेलेल्या महिला पत्रकारासहीत तिघांना मारहाण; मंचरमध्ये १२ जणांविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 12:19 IST2025-07-10T12:19:33+5:302025-07-10T12:19:47+5:30
जमीन मालकांनी अनधिकृत बांधकामाबाबत पत्रकार स्नेहा बारवे यांना बातमी करण्यासाठी बोलावले होते

अनधिकृत बांधकामाची माहिती घेण्यासाठी गेलेल्या महिला पत्रकारासहीत तिघांना मारहाण; मंचरमध्ये १२ जणांविरोधात गुन्हा दाखल
मंचर: निघोटवाडी हद्दीत अनधिकृत बांधकामाची माहिती घेण्यासाठी गेलेली महिला पत्रकार व इतर तिघांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बारा जनाविरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या संदर्भात सुधाकर बाबुराव काळे (रा. मुळेवाडी रोड मंचर) यांनी फिर्याद दिली आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता निघोटवाडी गावच्या हद्दीत सर्वे नंबर 41/1 मध्ये पांडुरंग सखाराम मोरडे यांनी अनधिकृतपणे पत्राशेड व दुकान बांधले होते. या संदर्भात जमीन मालकांनी पत्रकार स्नेहा बारवे यांना बातमी करण्यासाठी बोलावले होते. स्नेहा बारवे या बातमी करत असताना पांडुरंग सखाराम मोरडे त्याची मुले प्रशांत पांडुरंग मोरडे व निलेश पांडुरंग मोरडे ( सर्व रा. मंचर) तसेच इतर आठ ते नऊ लोक हे त्या ठिकाणी आले. एकत्रित येऊन त्यांनी लाकडी दांडका व प्लॅस्टिकच्या कॅरेटने तसेच लाथा बुक्क्यांनी पत्रकार स्नेहा बारवे, विजेंद्र थोरात, संतोष काळे व फिर्यादी सुधाकर काळे यांना मारहाण केली आहे. यावेळी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. सुधाकर भाऊराव काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पांडुरंग सखाराम मोरडे, प्रशांत पांडुरंग मोरडे, निलेश पांडुरंग मोरडे व इतर आठ ते नऊ अनोळखी लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बडगुजर करत आहे.