साहेब, आम्ही अविनाशची हत्या केलीय; २ मित्र थेट पोलीस ठाण्यात पोहोचले, बारामतीत उडाली खळबळ...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 12:28 IST2025-12-15T12:28:18+5:302025-12-15T12:28:33+5:30
दोघे भानावर आल्यावर त्यांनी स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन या घटनेची माहिती दिली, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे

साहेब, आम्ही अविनाशची हत्या केलीय; २ मित्र थेट पोलीस ठाण्यात पोहोचले, बारामतीत उडाली खळबळ...
बारामती: दारुची पार्टी करणाऱ्या तिन मित्रांमध्ये झालेल्या वादातुन एका तरुणाचा अन्य दोघा मित्रांनी दगडाने मारहाण करत खुन केल्याची धक्कादायक घटना बारामती शहरात रविवारी(दि १४) रात्री घडली. या घटनेत धक्कादायक बाब म्हणजे दोघेही खून करून थेट पोलीस ठाण्यात पोहोचले. साहेब आम्ही अविनाशची हत्या केली असे म्हणत त्यांनी स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश उर्फ माऊली धनंजय लोंढे (वय २०,रा.बारामती)असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. अविनाश लोंढे आणि समीर इक्बाल शेख (वय २५,रा.देवळेे इस्टेट बारामती) प्रथमेश राजेंद्र दळवी (वय २०,रा.जगताप मळा,बारामती) हे तिघेजण रविवारी रात्री जुना बारामती माेरंगाव रस्त्यावर दारुची पार्टी करीत बसले होते. यावेळी दारुच्या नशेत वाद झाला. मात्र,वादाचे रुपांतर जोरदार भांडणात झाले. यामध्ये शेख आणि जगताप या दोघांनी अविनाश लोंढे यास दगडाने मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यु झाला. त्यानंतर भानावर आलेल्या जगताप आणि शेख या दोघांनी शहर पोलिसात हजर हाेत या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करीत आहेत.