लग्नानंतर तीन दिवसात नववधू दागिने व पैसे घेऊन पसार; आळंदीतील खळबळजनक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2023 18:17 IST2023-06-25T17:38:50+5:302023-06-25T18:17:15+5:30
खोटे कागदपत्रे असताना लग्नासाठी तीन लाख व सहा लाख रुपये घेतल्याप्रकरणी दोन मंगल कार्यालय चालकांवर गुन्हा दाखल

लग्नानंतर तीन दिवसात नववधू दागिने व पैसे घेऊन पसार; आळंदीतील खळबळजनक घटना
आळंदी : आळंदीत लग्नानंतर तीन दिवसात नवीन नवर्या स्त्रीधन व सासूचे दागिने यांच्यासह पसार झाल्या आहेत. याप्रकरणी खोटे कागदपत्रे असताना लग्नासाठी तीन लाख व सहा लाख रुपये घेतल्याप्रकरणी दोन मंगल कार्यालय चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना आळंदीतील जय अंबे मंगल कार्यालय व जोशी मंगल कार्यालय येथे २० ते २३ मे २०२३ या तीन दिवसाच्या कालावधीत घडली.
याप्रकरणी मुलाचे वडील सुभाष बाळा कोलते (वय ४५ राहणार जालना) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.२४) फिर्याद दिली असून समाधान डोंगरे, परमेश्वर, गोरखनाथ दराडे, जनक कुमार अमृतलाल जोशी, रोहिदास भैरवनाथ डबरी व दोन महिला आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा कैलास सुभाष कोलते व त्यांचा पुतण्या ज्ञानेश्वर आप्पा कोलते या दोघांचे समाधान डोंगरे व परमेश्वर दराडे यांनी दोन मुलींची लग्न जमवली. यावेळी मुलींची बनावट आधारकार्ड व कागदपत्रे बनवून आळंदी येथील जोशी मंगल कार्यालय व जय अंबे मंगल कार्यालय येथे लग्न लावण्याचे ठरले. त्यानुसार मंगल कार्यालय मालकांनी प्रत्येकी तीन लाख रुपये घेतले.
मात्र, दोन्ही नवीन नवऱ्या या त्यांना दिलेले प्रत्येकी ५० हजार रुपयांचे स्त्रीधन तसेच सासूचे अडीच तोळ्याचे सुमारे एक लाख रुपयांचे दागिने घेऊन पसार झाल्या आहेत. अवघ्या तीन दिवसात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी आळंदी पोलीस ठाण्यात जात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून आळंदी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.