महापालिकेच्या प्रभाग रचनेत तीन बदल;निवडणुकीसाठी अंतिम रचना जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 13:46 IST2025-10-07T13:45:19+5:302025-10-07T13:46:33+5:30

- नावे बदलली, चार प्रभागांतील हरकतींचा पूर्णपणे स्वीकार, दाेन ठिकाणी अंशतः मान्यता, सर्व नकाशे संकेतस्थळावर उपलब्ध 

Three changes in the ward structure of the Municipal Corporation; Final structure announced for the elections | महापालिकेच्या प्रभाग रचनेत तीन बदल;निवडणुकीसाठी अंतिम रचना जाहीर

महापालिकेच्या प्रभाग रचनेत तीन बदल;निवडणुकीसाठी अंतिम रचना जाहीर

पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना साेमवारी (दि.६) सायंकाळी प्रसिद्ध करण्यात आली. त्यात चार प्रभागांच्या सूचना पूर्णपणे स्वीकारल्या असून त्यानुसार प्रभागात बदल केला आहे. तीन प्रभागांची नावे बदलली आहेत. दोन प्रभागांबाबतच्या हरकती अंशतः स्वीकारल्या आहेत.

महापालिकेची निवडणूक २०१७ मधील प्रभाग रचनेनुसार चार सदस्यीय पद्धतीने होणार आहे. त्यासाठी २०११ ची जनगणना ग्राह्य धरली आहे. १७ लाख २७ हजार ६९२ लोकसंख्येनुसार अंतिम प्रभाग रचना तयार केली. यावेळीही ३२ प्रभाग आणि १२८ नगरसेवकांची संख्या असणार आहे. महापालिकेने २२ ऑगस्टला प्रारूप रचना जाहीर केली होती. त्यानंतर ४ सप्टेंबरपर्यंत सूचना आणि हरकतींसाठी मुदत होती. ३१८ हरकती नोंदविल्या होत्या. त्यावर सुनावणी झाली. सुनावणीच्या वेळी एका आमदाराने हॉटेलमध्ये घेतलेली अधिकाऱ्यांची भेट चर्चेची ठरली होती.

त्यानंतर महापालिका निवडणूक विभागाने प्रारूप प्रभाग रचना निवडणूक आयोगास सादर केली होती. तिच्या मान्यतेची शहरात उत्सुकता होती. अखेर सोमवारी सायंकाळी सहाला प्रसिद्ध झाली.

काय केले बदल..?

अंतिम प्रभाग रचनेमध्ये चिखली गावठाण (प्रभाग क्रमांक १) यातील ताम्हाणे वस्ती हा भाग तळवडे गावठाण, रूपीनगरला (प्रभाग क्रमांक १२) जाेडला आहे. भोसरी, धावडेवस्ती, चक्रपाणी वसाहत (प्रभाग क्रमांक ६) मधील गावजत्रा मैदान, महापालिका रुग्णालय परिसर हा भाग गव्हाणे वस्ती, भोसरी गावठाण (प्रभाग क्रमांक ७) मध्ये जाेडला आहे. तसेच थेरगाव दत्तनगर, पदमजी पेपरमिल (प्रभाग क्रमांक २४) येथील म्हाताेबावस्ती झाेपडपट्टीचा परिसर पुनावळे, ताथवडे (प्रभाग क्रमांक २५) प्रभागाला जाेडला आहे.

नाव बदल झालेले प्रभाग (कंसात जुने नाव)

प्रभाग क्रमांक १० : संभाजीनगर, मोरवाडी, अण्णासाहेब मगरनगर, टिपू सुलताननगर, बीएसएनएल परिसर, एमआयडीसी कार्यालय (संभाजीनगर, मोरवाडी)

प्रभाग क्रमांक ११ : नेवाळे वस्ती, कृष्णानगर, घरकुल, भीमशक्तीनगर (नेवाळे वस्ती, कृष्णानगर, घरकुल)

प्रभाग क्रमांक २६ : वाकड, पिंपळे निलख, विशालनगर (पिंपळे निलख, विशालनगर)
 

महापालिका प्रभाग रचनेचा अंतिम आराखडा तसेच नकाशे पाहण्याची सोय पिंपरीतील महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आणि प्रभाग कार्यालयामध्ये केली आहे. सर्व नकाशे मंगळवारपासून महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत.  - अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, निवडणूक विभाग

Web Title: Three changes in the ward structure of the Municipal Corporation; Final structure announced for the elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.