Pune: ड्रग्स प्रकरणातील तस्कर ईडीच्या रडारवर; आरोपी अन् मालमत्तेची माहिती मागवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 14:06 IST2024-03-06T14:04:47+5:302024-03-06T14:06:21+5:30
यासंदर्भातील पत्र ईडीने पुणे पोलिसांना पाठविले असून, गुन्ह्याची व यात समावेश असलेल्या आरोपींची आणि त्यांच्या मालमत्तेची पूर्ण माहितीही द्यावी, असे नमूद केले आहे. पुणे पोलिसांकडून संबंधित माहिती देण्यात येत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले....

Pune: ड्रग्स प्रकरणातील तस्कर ईडीच्या रडारवर; आरोपी अन् मालमत्तेची माहिती मागवली
पुणे :पुणेपोलिसांच्या गुन्हे शाखेने आंतरराष्ट्रीय ड्रग तस्करीचे रॅकेट उघडकीस आणून शहरात खळबळ उडवून दिली होती. यात पुणे ते दिल्लीपर्यंत छापेमारी करत कोट्यवधी रुपयांचे ड्रग्स जप्त करीत अकराजणांना अटक करण्यात आली. आता ड्रग्स प्रकरणातील ते तस्कर सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) रडारवर असून, संपूर्ण प्रकरणाची माहिती ईडीने मागवली आहे. यासंदर्भातील पत्र ईडीने पुणे पोलिसांना पाठविले असून, गुन्ह्याची व यात समावेश असलेल्या आरोपींची आणि त्यांच्या मालमत्तेची पूर्ण माहितीही द्यावी, असे नमूद केले आहे. पुणे पोलिसांकडून संबंधित माहिती देण्यात येत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
यापूर्वी केंद्रीय तपास यंत्रणेमधील एटीएस, एनआयए, एनसीबीकडूनही या गुन्ह्यांची माहिती घेतली होती. त्यानंतर आता ईडीनेदेखील गुन्ह्यांची थोडक्यात माहिती मागवत यातील सर्व आरोपींबाबत माहिती व त्यांच्या मालमत्तेबाबत माहिती मागविली आहे. त्यानुसार पोलिसांनी संबंधित आरोपींच्या मालमत्तेबाबत माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.
पुण्याच्या सोमवार पेठ भागातून उघडकीस आलेल्या ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी वैभव ऊर्फ पिंट्या माने (वय ४०), अजय करोसिया (३५), हैदर नूर शेख (४०), भीमाजी परशुराम साबळे (वय ४६), केमिकल इंजिनिअर युवराज बब्रुवान भुजबळ (वय ४१), आयुब अकबरशहा मकानदार (वय ४८), दिल्लीतून संदीप राजपाल कुमार (वय ३९), दिवेष चरणजित भुथानी (वय ३८), संदीप हनुमानसिंग यादव (३२) व देवेंद्र रामफुल यादव (वय ३२) व पश्चिम बंगालमधून सुनील वीरेंद्रनाथ बर्मन (वय ४२) अशा अकराजणांना अटक केली, तर मास्टर माईंड संदीप धुणे याच्यासह ६ जण फरार आहेत.
पुणे पोलिसांनी १८ फेब्रुवारीला सोमवार पेठेत ही कारवाई केली आणि १७६० किलो मेफेड्रोन पकडले. या गुन्ह्याचा तपास मोठा असून, त्याचे कनेक्शन राज्यासह इतर देश आणि परदेशातदेखील निघाले आहेत. त्यामुळे गुन्ह्याची व्याप्ती आणि गुन्हा संवेदनशील आहे, तर गुन्ह्यात हवालामार्फत पैशांची देवाण-घेवाण झाल्याचे समोर आले.
दरम्यान, हैदर शेख, वैभव माने, ड्रग्जचे कारखाना मालक भिमाजी साबळे आणि केमिकल इंजिनिअर यांची काही माहिती आली आहे. त्यात साबळे याच्या नावावर संबंधित कंपनी आणि पिंपळे सौदागर येथील घर आहे, तर भुजबळ याचे मुंबईत एक घर असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.