पुणे महापालिकेत प्रवेशबंदी केलेल्यांचा अजूनही महापालिकेत वावर; दहशतीमुळे सुरक्षा रक्षक अडवतच नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 11:38 IST2025-07-25T11:37:56+5:302025-07-25T11:38:40+5:30
कंत्राटी सुरक्षा रक्षकांचे काम १ तारखेपासून थांबवण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला करण्यात येणार, सुरक्षा अधिकाऱ्याची माहिती

पुणे महापालिकेत प्रवेशबंदी केलेल्यांचा अजूनही महापालिकेत वावर; दहशतीमुळे सुरक्षा रक्षक अडवतच नाहीत
पुणे: महापालिकेतील महिला अधिकाऱ्यास जाणीवपूर्वक मानसिक त्रास देणाऱ्याची पाठराखण करणाऱ्या महापालिकेच्या पाच कंत्राटी सुरक्षा रक्षकांसह इतरांवर महापालिका आयुक्तांनी प्रवेशबंदीची कारवाई केली. मात्र, प्रवेशबंदीची कारवाई केलेल्यांपैकी काही जणांचा अजूनही महापालिका भवनात वावर असून, ते विविध विभागांमध्ये फिरताना दिसत आहेत.
महापालिकेच्या आरोग्य विभागात जमावाने येऊन महिला अधिकाऱ्यांचे चित्रीकरण करून दमदाटी केली. तसेच त्यांना कार्यालयाच्या बाहेर जाण्यास मज्जाव केल्याप्रकरणी भाजपच्या एका पदाधिकाऱ्यावर व त्याच्या सहकाऱ्यांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तत्पूर्वी महापालिका आयुक्तांनी संबंधित पदाधिकारी व त्यांची पाठराखण करणाऱ्यांवर महापालिका भवन व महापालिकेच्या मिळकतींमध्ये प्रवेशबंदीची कारवाई केली आहे. कारवाई केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये महापालिकेचे पाच कंत्राटी सुरक्षा रक्षक सहभागी असल्याचे समोर आल्यानंतर त्यांच्यावरही प्रवेशबंदीची कारवाई केली होती. मात्र, ही कारवाई कागदावरच राहिली असून, हे पाचही कंत्राटी सुरक्षा रक्षक अजूनही कामावर आहेत. हे सुरक्षा रक्षक व बंदी घातलेले काही कार्यकर्ते अजूनही महापालिका भवनातील विविध विभागांमध्ये वावरताना दिसतात. राजकीय वरदहस्त असल्याने ते प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षकांना दमदाटी करतात. त्यांच्या दहशतीमुळे त्यांना प्रवेशद्वारावर अडवण्यात येत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
नाव बदलून घेतला जातो पगार
प्रवेशबंदीची कारवाई केलेला एक कंत्राटी सुरक्षा अधिकारी कामावर कमी आणि महापालिका भवनातच जास्तवेळ दिसतो. या सुरक्षा रक्षकाची दोन नावे आहेत. प्रवेशबंदी केलेल्या आदेशावर वेगळे नाव नमूद आहे. आणि तो महापालिकेच्या कंत्राटी सुरक्षा रक्षक म्हणून दुसऱ्याच नावाने पगार घेतो. त्यामुळे याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यास पत्र देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रवेशबंदीची कारवाई झालेले पाचही सुरक्षा रक्षक अजून कामावरच आहेत. त्यातील काही जण महापालिका भवनात फिरत असतात, अशा तक्रारी आल्या आहेत. या पाचही कंत्राटी सुरक्षा रक्षकांचे काम १ तारखेपासून थांबवण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला करण्यात येणार आहेत. - राकेश विटकर, सुरक्षा अधिकारी, महापालिका