'हा निर्णय केवळ निराशाजनक नाही तर धोकादायक', ‘द केरला स्टोरी’ला पुरस्कार, FTII विद्यार्थी संघटनेतर्फे निषेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 11:15 IST2025-08-05T11:15:13+5:302025-08-05T11:15:48+5:30
जेव्हा एखादी शासकीय संस्था अशा चुकीची माहिती पोहोचविणाऱ्या आणि अल्पसंख्याकांविषयी अपप्रचार करणाऱ्या चित्रपटांना मोठं करत आहे

'हा निर्णय केवळ निराशाजनक नाही तर धोकादायक', ‘द केरला स्टोरी’ला पुरस्कार, FTII विद्यार्थी संघटनेतर्फे निषेध
पुणे: केंद्र सरकारच्या राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात ‘द केरला स्टोरी’ला सर्वोत्कृष्ट सिनेमॉटेग्राफी आणि सुदीप्तो सेन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार दिल्याबद्दल एफटीआयआयविद्यार्थी संघटनेतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला आहे. हा निर्णय केवळ निराशाजनक नाही तर धोकादायक असल्याचे विद्यार्थी संघटनेचे म्हणणे आहे.
‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट नाही, तर ते एक शस्त्र आहे. मुस्लीम समुदायाला बदनाम करण्यासाठी आणि ऐतिहासिकदृष्ट्या सांप्रदायिक सौहार्द, शिक्षण आणि प्रतिकारासाठी उभे राहिलेल्या संपूर्ण राज्याला राक्षसी बनवण्यासाठी एक खोटी कथा रचण्यात आली आहे. हा चित्रपट तटस्थ नाही तर प्रभाव पाडणारे एक सशक्त हत्यार आहे. जेव्हा एखादी शासकीय संस्था अशा चुकीची माहिती पोहोचविणाऱ्या आणि अल्पसंख्याकांविषयी अपप्रचार करणाऱ्या चित्रपटांना मोठं करत असेल तर ते केवळ ‘कलेला मान्यता देत नाही तर हिंसाचाराला खतपाणी घालतात. ते भविष्यात लिंचिंग, सामाजिक बहिष्कार आणि राजकीयसह इतर गोष्टींचे जणू कथालेखन करत आहेत. ते अब्जावधी लोकांना सांगत आहेत की, हा द्वेष स्वीकार्य आहे. हीच ती कथा आहे, जी आमच्यासाठी बक्षीसपात्र आहे. मात्र, इस्लामफोबिया आता पुरस्कारयोग्य आहे हे आम्ही स्वीकारण्यास नकार देतो. आम्ही ज्या चित्रपट उद्योगात प्रवेश करू इच्छितो, तो उद्योग खोटेपणा, कट्टरता आणि फॅसिस्ट विचारसरणीचा पुरस्कार करीत असेल तर आम्ही गप्प राहू शकत नाही, असे संघटनेने स्पष्ट केले आहे.