भाजपची ही दडपशाही चालणार नाही; खरगेंना धक्काबुक्कीचा पुण्यात काँग्रेसकडून निषेध
By राजू इनामदार | Updated: December 19, 2024 18:34 IST2024-12-19T18:33:52+5:302024-12-19T18:34:30+5:30
देशातील राजकीय संस्कृती बिघडवण्याचे काम भाजपकडून सुरू असून काँग्रेस याचा प्रतिकार करेल

भाजपची ही दडपशाही चालणार नाही; खरगेंना धक्काबुक्कीचा पुण्यात काँग्रेसकडून निषेध
पुणे: संसदेच्या प्रवेशद्वारावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना भाजप खासदारांकडून धक्काबुक्की झाली. काँग्रेसने त्याचा निषेध केला आहे. गुरूवारी (दि.२०) काँग्रेसच्या शहर शाखेने यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन जाहीर केले आहे. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी हा प्रकाराचा निषेध करून ही दडपशाही चालणार नाही असे म्हटले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्यावरून संसदेत गदारोळ सुरू आहे. काँग्रेसचे खासदार व खरगे संसदेत जात असताना संसदेच्या प्रवेशद्वारावर त्यांना धक्का मारला गेला. हे वर्तन निषेधार्ह आहे. भाजपकडून सत्ताप्राप्तीनंतर सातत्याने चुकाच सुरू आहेत. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या बाबतीत असे काही करणे देशातील जनता सहन करणार नाही असे जोशी म्हणाले.
काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सांगितले की, राज्यातही अनेक गैरप्रकार सुरू आहेत. दलित व्यक्तींवर अत्याचार होत असून दोन ठिकाणी त्यांची हत्याही करण्यात आली. गुरूवारी (दि.२०) सकाळी साडेअकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र व राज्य सरकारच्या या मनमानी विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. देशातील राजकीय संस्कृती बिघडवण्याचे काम भाजपकडून सुरू असून काँग्रेस याचा प्रतिकार करेल असे ते म्हणाले.