महिलांचे दुसऱ्या पुरुषासोबत लॉजमधून बाहेर पडतानाचे व्हिडीओ काढायचा आणि...! गाडेचा आणखी कारनामा समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 14:30 IST2025-03-04T14:24:53+5:302025-03-04T14:30:16+5:30
महिलांचे दुसऱ्या पुरुषासोबतचे रेकॉर्ड करून त्याआधारे ब्लॅकमेल करून शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करत असल्याची धक्कादायक माहिती समोर

महिलांचे दुसऱ्या पुरुषासोबत लॉजमधून बाहेर पडतानाचे व्हिडीओ काढायचा आणि...! गाडेचा आणखी कारनामा समोर
पुणे : स्वारगेट या गंभीर घटनेच्या सहा दिवसांनंतर या प्रकरणाचा तपास पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हे शाखेकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. गुन्हे शाखेला आरोपी दत्तात्रय गाडे याचा मोबाइल जप्त करण्यासाठी गुनाट गावात पथके पाठवून शोधमोहीम राबवणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, स्वारगेट पोलिसांनी आरोपी दत्तात्रय गाडे याने गुन्हा करताना वापरलेली पँट सोमवारी (दि. ३) जप्त केली. आरोपीला दोषी सिद्ध करण्यासाठी लागणारे सबळ पुरावे आता पुणे पोलिसांकडे असून, त्याला कठोरातील कठोर शिक्षा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याची माहिती अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी दिली. पोलिसांकडे सीसीटीव्ही फुटेज, आरोपी व पीडितेचे लोकेशन, सीडीआर डिटेल्स यासह बायोलॉजिकल पुरावे असून, याप्रकरणी आता केवळ चार्जशीट न्यायालयात सादर करण्याचे काम बाकी आहे.
आरोपीचा मोबाइल महत्त्वाचा...
आरोपी दत्तात्रय गाडे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने त्याला गुन्हा केल्यानंतर पोलिसांना काय उत्तरे द्यायची याचे चांगलेच ज्ञान आहे. आरोपीने यापूर्वीदेखील विवाहित महिलांचे दुसऱ्या पुरुषासोबत त्या लॉजमधून बाहेर पडतानाचे व्हिडीओ मोबाइलमध्ये रेकॉर्ड करत त्याआधारे त्यांना ब्लॅकमेल करून शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करत असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. आरोपी दत्तात्रय याने मंगळवारी (दि. २५) पोलिसांपासून लपत असताना, त्याचा मोबाइल गावातच कुठेतरी लपवून ठेवल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे आरोपीचा मोबाइल जप्त करणे गरजेचे आहे.
पोलिसांनी केला चहूबाजूंनी तपास..
पोलिसांनी या प्रकरणी सर्व शक्यता लक्षात घेत चहूबाजूंनी याप्रकरणी तपास केला आहे. पीडितेच्या मोबाइलचे सीडीआर डिटेल्स पोलिसांनी तपासले असता, ती घर ते नोकरीचे ठिकाणी आणि नोकरीचे ठिकाण ते घर या व्यतिरिक्त अन्यत्र सुटीच्या दिवशीदेखील कुठे अवांतर फिरत नसल्याचे सिद्ध झाले आहे. तसेच पीडितेचा ये-जा करण्याच मार्गदेखील एकच असल्याचे या तांत्रिक अहवालावरून स्पष्ट झाले आहे. तसेच पीडिता एका राजकीय नेत्याच्या भावकीत असल्याची माहितीदेखील समोर आली आहे.