२० दिवसापूर्वीच थार घेतलेली, कोकणात फिरण्यासाठी निघाले होते, चौघांचा मृतदेह सापडला, दोनजण बेपत्ता; ओळख पटली, नाव आली समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 17:56 IST2025-11-20T17:56:33+5:302025-11-20T17:56:54+5:30
हे तरुण पुण्यातील कोंढवे, धावडे आणि कोपरे गावातील आहेत. सहा मित्र १७ नोव्हेंबरच्या रात्री घरातून उत्साहाने निघाले होते. मात्र काही तासांतच त्यांच्या आयुष्याचा शेवट ताम्हिणी घाटातील खोल दरीत झाला.

२० दिवसापूर्वीच थार घेतलेली, कोकणात फिरण्यासाठी निघाले होते, चौघांचा मृतदेह सापडला, दोनजण बेपत्ता; ओळख पटली, नाव आली समोर
ताम्हिणी घाटातील धोकादायक वळणावर थार गाडीचा अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. अपघात होऊन तीन दिवस उलटले आहेत, तीन दिवसानंतर अपघात झाल्याचे समोर आले. पोलिसांनी आणि बचाव पथकांनी सकाळपासून शोधमोहिम सुरू केली होती. थारमधून सहा जण प्रवास करत होते. यामधील चौघांचे मृतदेह सापडले आहेत. शोधमोहिम अजूनही सुरूच आहे.
हे तरुण पुण्यातील कोंढवे, धावडे आणि कोपरे गावातील आहेत. सहा मित्र १७ नोव्हेंबरच्या रात्री घरातून उत्साहाने निघाले होते. मात्र काही तासांतच त्यांच्या आयुष्याचा शेवट ताम्हिणी घाटातील खोल दरीत झाला.
ताम्हिणी घाटाचा पोलिसांना संशय आला
मिळालेल्या माहितीनुसार, १७ नोव्हेंबरच्या रात्री ११.३० वाजता पुण्याहून निघालेल्या या तरुणांचा वाटेतच कुटुंबीयांशी संपर्क तुटला. सतत संपर्क न झाल्यानंतर कुटुंबीयांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी लगेच कारवाई करत सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक तपासाच्या आधारे तपास सुरू केला. यावेळी पोलिसांना ताम्हिणी घाटाचा संशय आला. पोलिसांना लगेच तपास वाढवला.
पोलिसांनी मोबाईलचे लोकेशन पाहून ताम्हिणी घाटातील धोक्याच्या वळणांचा शोध घेतला. पोलिसांनी ड्रोनच्या सहाय्याने शोध घेतला. यावेळी पोलिसांना खोल दरीमध्ये थार गाडी आणि मृतदेह दिसून आले, यानंतर पोलिसांनी लगेच चक्रे फिरवत मदत मोहिम सुरू केली. खोल दरीतून मृतदेह काढण्यासाठी सगळी व्यवस्था लावण्यात आली.
चार जणांचा मृतदेह सापडला
पोलिसांनी ताम्हिणी घाटातील दरीमध्ये ड्रोन सोडला. यावेळी पोलिसांना एक थार गाडी आणि चार जणांचे मृतदेह सापडले. दरी उभी आणि दगडी असल्यामुळे बचावकार्य कठीण झाले. मृतांमध्ये शहाजी चव्हाण (२२), पुनित सुधारक शेट्टी (२०), साहिल बोटे (२४) आणि महादेव कोळी (१८) यांचा समावेश आहे. तर ओंकार कोळी (१८) आणि शिवा माने (१९) हे दोन मित्र अजूनही सापडलेले नाहीत. अद्यापही शोधमोहीम सुरू आहे.