Pune: लोकअदालतीत शुक्रवारी उडाला होता फज्जा; आता थेट प्रमुख जिल्हा न्यायाधीशच उतरले मैदानात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 20:03 IST2025-09-13T20:02:50+5:302025-09-13T20:03:15+5:30
शिवाजीनगर न्यायालयात दंडाची रक्कम भरण्यासाठी झालेली झालेली गर्दी , लांबच लांब लागलेल्या रांगा हे पाहिल्यानंतर थेट प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजनच मैदानात उतरले

Pune: लोकअदालतीत शुक्रवारी उडाला होता फज्जा; आता थेट प्रमुख जिल्हा न्यायाधीशच उतरले मैदानात
पुणे : लोकअदालतमध्ये वाहतूक नियमभंगांवरील प्रलंबित दंड सवलतीत भरण्याच्या उपक्रमामध्ये शुक्रवारी (दि.१२) नियोजनाचा फज्जा उडाला होता. शनिवारी (दि. १३) शिवाजीनगर न्यायालयात दंडाची रक्कम भरण्यासाठी झालेली झालेली गर्दी , लांबच लांब लागलेल्या रांगा हे पाहिल्यानंतर थेट प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजनच मैदानात उतरले. मनुष्यबळ कमी आहे. मॅन्युअली कारभार सुरू आहे. त्यामुळे थोडासा वेळ लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. जेणेकरून तुम्हाला वारंवार न्यायालय अथवा पोलीस स्टेशनला जाण्याची वेळ येणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.
पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि पुणे शहर वाहतूक पोलीस यांच्या वतीने दि. १० ते १३ सप्टेंबर या कालवधीत वाहतूक दंड सवलतीची लोकअदालत आयोजित केली होती. येरवडा येथे शुक्रवारी या लोक अदालतमध्ये अचानक गर्दी झाल्याने फज्जा उडाला होता. मात्र, आज शिवाजीनगर न्यायालयात ही लोकअदालत होती. सकाळपासूनच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या पार्श्वभूमीवर प्रमुख जिल्हा न्यायाधीश महाजन यांनी सूत्र काहीशी हातात घेत नागरिकांना संबोधित केले. ते म्हणाले, आम्हाला या योजनेचा सर्वांना फायदा द्यायचा आहे. या पार्श्वभूमीवर ज्या लोकांचे चलन रजिस्टर झाले नाही. त्यांना या योजनेचा फायदा देता येत नाही. पोलिसांकडे अॉनलाईन रक्कम भरायची असेल तर पूर्ण रक्कम भरावी लागणार आहे. यासाठी ज्यांचे रजिस्टेशन झाले नाही. त्यांना टोकन दिले आहे. एक महिन्यात रजिस्टर केले जाईल. उच्च न्यायालय अथवा सरकारकडून परवानगी मिळाली तर अॉनलाईन दंड भरता येणार आहे. परवानगी न मिळाल्यास न्यायालयात येऊन चलन भरावे लागेल. मागील दोन दिवसात १ कोटी ८ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. तेवढाच फायदा नागरिकांना झाला असल्याचे त्यांनी सांगितले.