विमानात तांत्रिक बिघाड होता की वैमानिकांकडून काही चूक, याची सखोल चौकशी व्हावी - छगन भुजबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 10:05 IST2026-01-29T10:04:32+5:302026-01-29T10:05:48+5:30
धावपट्टी चांगली असतानाही धावपट्टीपासून अवघ्या २५ ते ३० फूट अंतरावर विमान धडकल्याने हा अपघात झाला असावा, असे प्रथमदर्शनी वाटते

विमानात तांत्रिक बिघाड होता की वैमानिकांकडून काही चूक, याची सखोल चौकशी व्हावी - छगन भुजबळ
बारामती: अपघाताचे दृश्य पाहिल्यानंतर मन सुन्न झाले आहे. विमानाचे तुकडे इतक्या भीषण अवस्थेत पडले होते की या अपघातात माणसांचे काय झाले असेल, याचा विचारही करवत नाही, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.
भुजबळ यांनी आज अपघातस्थळी पाहणी केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, धावपट्टी चांगली असतानाही धावपट्टीपासून अवघ्या २५ ते ३० फूट अंतरावर विमान धडकल्याने हा अपघात झाला असावा, असे प्रथमदर्शनी वाटते. धावपट्टीपासून लांब आणि सुमारे ५० फूट खोल विमान कोसळले आहे. नेमकी चूक कुणाची होती, विमानात तांत्रिक बिघाड होता की वैमानिकांकडून काही चूक झाली, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
या अपघातात पवार कुटुंबाची अपूरणीय हानी झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही मोठा धक्का बसला आहे, असे भुजबळ म्हणाले. “कालच अजित पवार यांच्यासोबत जवळपास दोन तास चर्चा झाली होती. ती चर्चा नेहमीप्रमाणेच होती. गेली ३५ वर्षे आम्ही एकत्र काम करत होतो. अजित पवार आता भेटणार नाहीत, यावर अजूनही विश्वास बसत नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
अपघाताच्या चौकशीबाबत बोलताना भुजबळ म्हणाले की, वेगळी मागणी करण्याची गरज नाही. संबंधित सर्व विभागांकडून ही चौकशी आपोआपच केली जाईल. विमान अपघातासंदर्भातील सर्व बाबी तपासून सत्य समोर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.