Pune Porsche Car Accident: ससूनमध्ये आल्याचा कोणताही पुरावा नाही; डॉ. तावरेंच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 21:22 IST2025-07-02T21:21:20+5:302025-07-02T21:22:18+5:30
डॉ. तावरे कुणाशी फोनवर बोलले याबाबत काही रेकॉर्ड नाही, डॉ. श्रीहरी हाळनोर याला फोन झाले असे म्हटले जात असले तरी तो त्यांचा सहकारीच असल्याने. फोन झाला यात नवीन काही नाही

Pune Porsche Car Accident: ससूनमध्ये आल्याचा कोणताही पुरावा नाही; डॉ. तावरेंच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद
पुणे: ‘ससून’च्या न्यायवैद्यक विभागाचे तत्कालीन प्रमुख डॉ. अजय तावरे यांच्यावर खोटे कागदपत्र तयार करणे किंवा कागदपत्रात फेरफार करणे (कलम ४६४) आणि मौल्यवान सुरक्षा किंवा इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या बनावटगिरी करणे ( कलम ४६७) ही कलमे लावण्यात आली आहेत. मात्र जो व्यक्ती बनावटगिरी करतो त्यांनाच ही कलमे लागतात. दुस-या व्यक्तीला लागत नाही. त्याप्रमाणे डॉ. तावरे हे त्यादिवशी ससूनमध्ये आलेच नाहीत. ते ससूनमध्ये आल्याचा कोणताही पुरावा नाही असा युक्तिवाद डॉ. तावरे याचे वकील डॉ. सुधीर शहा यांनी बुधवारी ( दि. २) न्यायालयात केला.
कल्याणीनगर ‘पोर्शे’ कारअपघात प्रकरणात अल्पवयीन कारचालकासह त्याच्या दोन अल्पवयीन मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी सर्व दहा आरोपींविरोधात आरोप निश्चितीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अपघाताच्या घटनेपूर्वी कारचालक मुलगा व पाठीमागील आसनावर बसलेल्या दोन मित्रांनी अपघातापूर्वी मुंढव्यातील दोन पबमध्ये मद्यपान केले होते. त्यामुळे त्यांच्या रक्ताचे नमुने तपासण्यासाठी सर्वांना ससून रुग्णालयात नेण्यात आले होते. तिथे या मुलांच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी विशाल अगरवाल, शिवानी अगरवाल आणि अरुणकुमार सिंग यांनी अश्पाक मकानदार, अमर गायकवाड, आदित्य सूद, आशिष मित्तल यांच्याशी संगनमत करून शिपाई अतुल घटकांबळेमार्फत ‘ससून’च्या आपत्कालीन विभागाचा तत्कालीन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर आणि न्यायवैद्यक विभागाचा तत्कालीन प्रमुख डॉ. अजय तावरे यांना लाच दिल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे
पुणे सत्र न्यायालयात सरकारी पक्षांच्या युक्तिवादांनंतर बचाव पक्षाच्या युक्तिवादाला सुरुवात झाली आहे. बुधवारी डॉ. अजय तावरे याच्या वतीने ज्येष्ठ वकील ऍड सुधीर शाह यांनी युक्तिवाद केला. सरकारी पक्षाने गुन्हयाचा कट रचल्याचा मुद्दा अधोरेखित केला होता, अगरवाल यांचा अल्पवयीन मुलाला सोडविण्याबाबत चर्चा चाललेली होती. त्याच्यावरचा गुन्हा न्यायालयात सिद्ध होईलच. पण मुलाला गुन्ह्यातून सोडविण्याचा प्रयत्न करणे हा आई वडिलांचा मूलभूत अधिकार आहे. त्याला सोडविण्यासाठी वकील देणे हे त्यांचे कर्तव्य आहे. त्यामुळे यात कटाचा मुद्दा येतच नाही. डॉ. तावरे कुणाशी फोनवर बोलले याबाबत काही रेकॉर्ड उपलब्ध नाही. डॉ. श्रीहरी हाळनोर याला फोन झाले असे म्हटले जात असले तरी तो त्यांचा सहकारीच आहे. फोन झाला यात नवीन काही नाही. त्यामुळे डॉ. तावरे यांच्याविरुद्ध आरोप निश्चितीला कोणताही ठोस पुरावा नाही. दरम्यान, इतर नऊ आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद दि. ८ जुलै रोजी होणार आहे.