विरोधी पक्षनेतेपदाची घोषणाच नाही; सरकार विरोधी पक्षाला इतके का घाबरते? सतेज पाटलांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 16:57 IST2025-04-07T16:56:51+5:302025-04-07T16:57:55+5:30

लोकशाहीसाठी विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्षनेता निवडणे गरजेचे असून आम्ही नाव देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे

There is no announcement of the post of Leader of Opposition Why is the government so afraid of the opposition? Satej Patil's question | विरोधी पक्षनेतेपदाची घोषणाच नाही; सरकार विरोधी पक्षाला इतके का घाबरते? सतेज पाटलांचा सवाल

विरोधी पक्षनेतेपदाची घोषणाच नाही; सरकार विरोधी पक्षाला इतके का घाबरते? सतेज पाटलांचा सवाल

पुणे: महाविकास आघाडीतील सर्वात मोठा पक्ष म्हणून आम्ही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्याचा प्रस्ताव पूर्वीच दिला आहे. मात्र, सरकारकडून विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा केली जात नाही. सरकार विरोधी पक्षाला इतके का घाबरते? असा सवाल माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी उपस्थित केला आहे.

शहर कॉंग्रेसच्या निरीक्षकपदी नेमणूक झाल्यानंतर सतेज पाटील यांनी सोमवारी काँग्रेस भवनमध्ये आजी-माजी आमदार, खासदार, माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यानिमित्ताने घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, बाळासाहेब शिवरकर, राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी, माजी नगरसेवक अविनाश बागवे, अजित दरेकर, बाळासाहेब मारणे, सौरभ आमराळे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, लोकशाहीसाठी विधानसभा अध्यक्षांनी विधानसभेचा विरोधी पक्षनेता निवडण्याचा निर्णय घेणे गरजेचे आहे. आम्ही नाव देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सत्तेसाठी जे कोणी काँग्रेस पक्षाच्या बाहेर जात आहेत, त्यांना आम्ही काय करू शकत नाही. मात्र, जे पक्षात राहतील ते आमचे शिलेदार असतील. आमच्या प्रदेशाध्यक्षांची इच्छा पक्षासाठी वेळ देणाऱ्यांना संधी देण्याची आहे. त्यानुसार भविष्यात संघटनात्मक बदल होतील.

सत्ताधाऱ्यांचा गैरव्यवहार जनतेसमोर आणू

महापालिकेत प्रशासक राज येऊन तीन वर्षांहून अधिक कालावधी लोटला आहे. एकाच कामाचे बिल महापालिका आणि जिल्हा नियोजन मंडळाकडून काढली जात असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे यात गैरव्यवहार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढील काळात आम्ही नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासह प्रशासक काळात महापालिकेमध्ये झालेले गैरव्यवहार जनतेसमोर आणू. आगामी निवडणुका स्वतंत्र लढायच्या की महाविकास आघाडीच्या माध्यमातून, याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. आता मात्र आम्ही संघटनात्मक बांधणी आणि सत्ताधाऱ्यांचा गैरव्यवहार जनतेसमोर आणण्यावर भर देणार आहोत. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटना दाबून ठेवण्यासारखी नाही. यातील दोषींवर कारवाई व्हावी, ही कॉंग्रेस पक्षाची भूमिका आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

Web Title: There is no announcement of the post of Leader of Opposition Why is the government so afraid of the opposition? Satej Patil's question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.