...त्यांच्या संशोधनाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 05:40 PM2018-08-16T17:40:44+5:302018-08-16T17:50:00+5:30

मोठ्या भावाने केलेली मजुरी.. आई-वडिलांनी केलेली आर्थिक मदत या सर्वांच्या जोरावर ग्रामीण भागातील तरुणाने ‘पार्किन्सन’ या आजारावर संशोधन केले. त्यांच्या या संशोधनाची दखल स्वीडन देशातील ‘लिकोपिंग’ विद्यापीठाने घेतली व पुढील संशोधनासाठी त्यांना स्वीडनमध्ये आमंत्रित केले. 

...their research going on international level | ...त्यांच्या संशोधनाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल

...त्यांच्या संशोधनाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल

Next
ठळक मुद्देपंतप्रधानांच्या उपस्थितीत पीएचडी पदवी पार्किन्सन रोगाशी निगडीत अनुवंशिक उत्परीवर्ती अल्फा सायनुक्लीन प्रथिनावरील अभ्यास अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा :  कळंब येथील गणेश मोहिते यांचा प्रेरणादायी प्रवास

रविकिरण सासवडे

बारामती : अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा... जिल्हा परिषद शाळेत सातवीपर्यंतचे शिक्षण.... मोठ्या भावाने केलेली मजुरी आई-वडिलांनी केलेली आर्थिक मदत या सर्वांच्या जोरावर ग्रामीण भागातील तरुणाने ‘पार्किन्सन’ या आजारावर संशोधन केले. भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (आयआयटी) या संस्थेतून पीएचडीची पदवी प्राप्त करीत ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मिळवली. या तरुणाच्या संशोधनाची दखल थेट स्वीडन देशाने घेतली असून त्यांंना पुढील संशोधनासाठी आमंत्रित केले आहे. 
गणेश मारुती मोहिते (रा. कळंब, ता. इंदापूर) असे या कर्तबगार तरुणाचे नाव आहे. मोहिते यांची पाऊने तीन एकर जमीन आहे. या जमिनीतून मिळणाऱ्या अल्प उत्पन्नावर त्यांनी मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. अरूण व गणेश या त्यांच्या मुलांनीही आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करायचे ठरवले. गणेश हे अभ्यासात नेहमी पुढे असायचे. मात्र, महाविद्यालयीन शिक्षणासाठी मोठा खर्च होऊ लागल्यानंतर मोठे बंधू अरूण यांनी शिक्षण सोडून दुसऱ्याच्या शेतात मजुरी सुरू केली.परंतु, गणेश यांना शिक्षणापासून दूर जाऊ दिले नाही. त्यांनी देखील बँकेकडून कर्ज घेऊन शिक्षण सुरू ठेवले. 
दरम्यान, घरी दुग्धव्यवसाय व शेती कामामध्ये ते मदत करीत असत. त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण वालचंदनगर येथील वर्धमान विद्यालयात तर महाविद्यालयीन शिक्षण बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातून पूर्ण केले. तर पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुणे येथील मॉडर्न महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. त्यांनी सेट, नेट या परीक्षा अगदी पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केल्या. त्यामुळे त्यांना शासनाकडून शिष्यवृत्ती मिळू लागली. त्यांनी पीएचडीसाठी आयआयटी मुंबई या प्रतिष्ठित संस्थेत प्रवेश मिळवला. त्यांच्या संशोधकवृत्तीला या संस्थेत खरी दिशा मिळाली. ‘नोकरी मिळवण्यासाठी शिक्षण घ्यायचे नव्हते तर आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात काहीतरी भरीव कार्य करायला हवे. या भावनेतूनच मी शिकत राहिलो, असे गणेश सांगतात. मोहाली (पंजाब) येथे सहा महिन्यांपूर्वी पार पडलेल्या परिसंवादामध्ये १२७ देशांचे संशोधक उपस्थित होते. या परिसंवादामध्ये त्यांनी ‘पार्कि न्सन’ रोगाशी निगडीत अनुवांशिक उत्परीवर्ती अल्फा सायनुक्लिन प्रथिनावरील अभ्यास’ या संशोधनास ‘बेस्ट पोस्टर’ पुरस्कार मिळाला. त्यांच्या या संशोधनाची दखल स्वीडन देशातील ‘लिकोपिंग’ विद्यापीठाने घेतली व पुढील संशोधनासाठी त्यांना स्वीडनमध्ये आमंत्रित केले. 

पंतप्रधानांच्या उपस्थितीत पीएचडी पदवी 
भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (आयआयटी) या संस्थेचा पदवीदान समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. ११) आॅगस्टला पार पडला. या समारंभातच त्यांना पीएचडी प्रदान करण्यात आली. तत्पूर्वी त्यांनी पुणे विद्यापीठाच्या आयबीबी संस्थेत १ वर्ष, बंगळूर येथील एनसीबीएस संस्थेत १ वर्ष तर टाटा इन्स्टिट्यूट आॅफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेत ३ वर्ष संशोधनाचे काम केले. त्यानंतर आयआयटीमध्ये प्रवेश घेतला. मी स्वीडनला जाणार आहेत. मात्र, तेथील संशोधन संपले की आपल्या माणसांसाठी, शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्याची इच्छा असल्याचे गणेश यांनी सांगितले. 

====
... असे आहे संशोधन
पार्किन्सन रोगाशी निगडीत अनुवंशिक उत्परीवर्ती अल्फा सायनुक्लीन प्रथिनावरील अभ्यास केला आहे. जीन उत्परिवर्तनमुळे प्रथिनातील अमिनो आम्ल बदलतात यामुळे निर्माण झालेले  उत्परीवर्ती प्रथिन पेशिसाठी हानिकारक अथवा उपयुक्त असू शकते. अल्फा सायनुक्लीन जीन उत्परिवर्तन किंवा गुणन पार्किन्सन रोग होण्याशी संबंधित आहे. उत्परीवर्ती अल्फा प्रथिनांवर जैवभौतिक व पेशीसबंधी संशोधन केले आहे. या संशोधनामध्ये  ‘उत्परीवर्ती अल्फा प्रथिन जास्त प्रमाणात आॅलिगॉमर तयार करतात, हे आॅलिगॉमर  कदाचित पार्किन्सन रोग होण्यास कारणीभूत असावेत’ असा निष्कर्ष संशोधनातून निघाला आहे.

====
... संशोधक असूनही शेतीतील काम 
संशोधक असूनही त्यांच्यातला कष्टकरी शेतकरी जिवंत आहे. ‘लोकमत’ ला संशोधनाविषयी माहिती देत असतानाच ते ‘मला आता गायींच्या धारा काढायच्या आहेत. इथं आहे तोपर्यंत भावाला मदत करतो. आई-वडील, वहिनी, पत्नी सकाळपासून शेतात भूईमुग काढत आहेत. आमच्या शेतीला पाण्याची मोठी अडचण आहे. कुटुंबाच्या कष्टामुळे भूईमुगाचे पीक हाती लागले आहे. मात्र डाळिंबात मोठे नुकसान झाले आहे. भाऊ अरूण यांनी मोठ्या कष्टाने डाळिंबाची बाग जगविली आहे. मात्र बाजारत दर नसल्याने त्याचा हिरमोड झाला.’ असे त्यांनी सांगितले. मुलाच्या संशोधनाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आणि पंतप्रधानांच्या उपस्थितीत पीएचडी मिळाली या आनंदाने आई-वडिलांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. 

Web Title: ...their research going on international level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.