विदेशी नागरिकाच्या घरात चोरी; १४ लाख लंपास, एक अटकेत एक फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 13:27 IST2025-02-15T13:26:26+5:302025-02-15T13:27:18+5:30
फिर्यादी कुवेत येथील एका ऑइल कंपनीत फायनान्स विभागात काम करत असून वर्षातून दोन ते तीन वेळा ते भारतात येत असतात

विदेशी नागरिकाच्या घरात चोरी; १४ लाख लंपास, एक अटकेत एक फरार
पुणे : कुवेत देशातील ऑइल कंपनीत फायनान्स विभागात काम करणाऱ्या परदेशी नागरिकाच्या तरडे येथील घरातील जमिनीखाली तयार करण्यात आलेल्या तिजोरीतील सोन्याचे दागिने, चांदीच्या विटा असा तब्बल १४ लाख ५० हजारांचा ऐवज चोरी करणाऱ्या सराईत टोळीच्या एकाला लोणी काळभोरपोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून पोलिसांनीचोरी गेलेल्या दागिन्यांपैकी ९ लाख ५० हजारांचा ऐवज जप्त केला आहे.
संगतसिंग अजमेरसिंग कल्याणी (४५, रा. थेऊर रस्ता, वृंदावन पॅलेस, थेऊर, कोलवडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याचा एक साथीदार अद्याप फरार आहे. त्याच्याकडील चौकशीत त्याने चोरलेल्या दागिन्यांपैकी ९५.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि एक किलो चांदीची वीट जप्त करण्यात आली आहे. याबाबत स्टीफनविक्टर वलेरयण लासराडो (५१, अलअमादी, गव्हर्नरेट, देश कुवेत व रेल्वे कोलस वस्ती, तरडे) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. तरडे येथे लासराडो यांनी ४ गुंठे जागेवर घर बांधले आहे. ते कुवेत येथील एका ऑइल कंपनीत फायनान्स विभागात काम करतात. वर्षातून दोन ते तीन वेळा ते भारतात येत असतात. त्यांनी घराभोवती सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. परंतु, अचानक ३१ जानेवारी रोजी त्यांच्या घराचे कॅमेरे बंद दिसून आल्याने त्यांनी माहिती घेतली असता, त्यांच्या घरात घरफोडी झाल्याचे आढळून आले.
१ फेब्रुवारीला फिर्यादी हे कुवेतवरून पुण्याला निघाले. घरी पोहोचल्यावर त्यांना घराच्या बेडरूमधील फरशीखाली त्यांनी तिजोरी केली होती. त्यात एका डब्यात ठेवलेले दागिने चोरीला गेल्याचे त्यांना आढळले. त्यांचे तब्बल १४ लाख ५० हजारांचे दागिने यावेळी चोरीला गेले. याच गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असताना पोलिस उपनिरीक्षक अनिल जाधव यांना ही चोरी आरोपी संगतसिंग कल्याणी व त्याच्या साथीदाराने केल्याचे समजले. संगतसिंगचा माग काढण्यात पथकाला यश आले. तो वृंदावन पॅलेस येथील त्याच्या घरी आला असता, त्याला तेथून ताब्यात घेण्यात आले. तसेच, चोरीला गेलेले ९ लाख ५० हजारांचे दागिने जप्त करण्यात आले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील तीन घरफोडींचे, तसेच अन्य ठिकाणचे सहा असे तब्बल नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंंदे, सहायक पोलिस आयुक्त अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलिस अंमलदार गणेश सातपुते, संभाजी देविकर, विलास शिंदे, सुनील नागलोत, बाजीराव वीर, शैलेश कुदळे, योगेश पाटील, राहुल कर्डीले, प्रदीप गाडे, चक्रधर शीरगिरे यांच्या पथकाने केली.
आरोपींनी रेकी करून हा गुन्हा केल्याचे तपासात समोर येत आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचा साथीदार याला गुन्ह्याबाबत अधिक माहिती आहे. त्याला जमिनीतील तिजोरीबाबत माहिती कोठून मिळाली हे त्याला अटक केल्यानंतर निष्पन्न होईल. तसेच, त्यांच्याकडे या गुन्ह्यात गेलेला उर्वरीत ऐवज असल्याचेही संगतसिंग याच्याकडे केलेल्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. - राजेंद्र पन्हाळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, लोणी काळभोर पोलिस ठाणे.