Video: एका आठवड्यात ३ वेळा चोरी; मोरगावच्या मंदिर रोडवर सराफी दुकान फोडले, घटना सीसीटीव्हीत कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 16:02 IST2026-04-07T15:57:16+5:302026-04-07T16:02:32+5:30
गावची रखवाली करणाऱ्या नेपाळी लालबहादूर बिस्टा यांनी चोरट्यांसोबत केलेल्या प्रतिकार आणि धाडसामुळे मोठी दुर्घटना टळली.

Video: एका आठवड्यात ३ वेळा चोरी; मोरगावच्या मंदिर रोडवर सराफी दुकान फोडले, घटना सीसीटीव्हीत कैद
मोरगाव: बारामतीच्या पश्चिम भागात सध्या भुरट्या चोरांचा धुमाकूळ सुरू आहे. एक आठवड्यात तब्बल तीन वेळा मोरगाव येथे चोरीचा प्रयत्न करण्यात आलाय. सोमवारी रात्री मंदिर मार्गावर एक सराफी दुकान फोडण्यात आले. गावची रखवाली करणाऱ्या नेपाळी लालबहादूर बिस्टा यांनी चोरट्यांसोबत केलेल्या प्रतिकार आणि धाडसामुळे मोठी दुर्घटना टळली.
मोरगाव ता बारामती गावातील मध्यवर्ती ठिकाणी घडलेली ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. यामुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. हे अष्टविनायक स्थान असून येथील सुरक्षा व्यवस्था धोक्यात आली आहे. सोमवारी मध्यरात्री २.३० वा दरम्यान मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर तुळजाभवानी ज्वेलर्स या सराफी दुकानाचे शटरला असलेली कुलपे तोडून चोरट्याने दुकानात प्रवेश केला. यावेळी काही चांदीचा ऐवज चोरीला गेल्याचे सांगण्यात आले. लाल रंगाच्या कार गाडीतून चार चाकी गाडीतून आलेल्या चार ते पाच चोरट्यांनी सराफी दुकानावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी रात्रगस्ती घालत असणारा गावातील गुरखा याने सराफी दुकानासमोर जाताना सुरू असलेला दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला.
एका आठवड्यात ३ वेळा चोरी; मोरगावच्या मंदिर रोडवर सराफी दुकान फोडले, घटना सीसीटीव्हीत कैद#pune#morgaon#cctv#thiefpic.twitter.com/fYi1zaYjU5
— Lokmat (@lokmat) April 7, 2026
येथील घटनास्थळावर इतर तीन ते चार मोठी सराफी दुकाने आहेत. गावची रखवाली करणाऱ्या गुरख्याने रात्री धाडस करून या चोरांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळी चोरट्यांची संख्या पाच आणि प्रतिकार करणारा एक यामुळे हा संघर्ष प्रतिकार कमी पडला. तरीही प्रसंगावधान राखून जिद्द व चिकाटी सह धाडस दाखवून रखवालदाराचा प्रयत्न हा कौतुकास्पद असल्याचे ग्रामस्थांनी आज बोलताना सांगितले. चोरांनी यावेळी रखवालदाराच्या अंगावर गाडी घालत जीवे मारण्याचा प्रयत्न केला मात्र सुदैवाने त्यातून तो बचावला.
मोरगाव येथे घडलेल्या मोठ्या गंभीर घटना प्रकाराची दुपारपर्यंत सुपा किंवा मोरगाव पोलीस मदत केंद्रात तक्रार दाखल झालेले नाही. सराफी व्यावसायिक कायदेशीर गुन्हा दाखल करण्यासाठी टाळा-टाळ करत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. घटनास्थळावर चार ते पाच मोठ मोठी सोन्या-चांदीचे दुकाने आहेत. तक्रार देण्यासाठी संबंधित व्यावसायिक कोणत्या कारणामुळे टाळाटाळ करीत होता हे मात्र समजू शकले नाही.