'स्वातंत्र्याची अमृतगाथा' महानाट्यातून उलघडले महापुरुषांचे कार्य; एकच रंगमंचावर तब्बल ११०० विद्यार्थी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 09:20 IST2023-01-23T09:20:27+5:302023-01-23T09:20:42+5:30
सलग २ तास १५ मिनिटांचे हे महानाटय असून भारताचा इतिहास व संस्कृती यानिमित्ताने पुणेकरांनी अनुभविली

'स्वातंत्र्याची अमृतगाथा' महानाट्यातून उलघडले महापुरुषांचे कार्य; एकच रंगमंचावर तब्बल ११०० विद्यार्थी
पुणे : प्राचीन भारतातील चाणक्य-चंद्रगुप्त मौर्य त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड, १८५७ चे स्वातंत्र्यसमर, वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी यांसारख्या महापुरुषांचे कार्य महानाटयाच्या माध्यमातून पुणेकरांसमोर उलगडले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्राचीन भारतापासून ते अगदी आजपर्यंतच्या भारताचा वैभवशाली इतिहास 'स्वातंत्र्याची अमृतगाथा' या महानाटयातून पुण्यात तब्बल ११०० विद्यार्थ्यांनी एकाच रंगमंचावर सादर केला.
शि.प्र.मंडळीच्या एस.पी.एम.इंग्लिश स्कूल सदाशिव पेठ तर्फे स्वातंत्र्याची अमृतगाथा या महानाटयाचे आयोजन स.प.महाविद्यालयाच्या हॉकीच्या मैदानावर करण्यात आले होते. सलग २ तास १५ मिनिटांचे हे महानाटय असून भारताचा इतिहास व संस्कृती यानिमित्ताने पुणेकरांनी अनुभविली. नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर यांचे कार्य देखील नाटकातून उलगडण्यात आले. तसेच भारतीय स्वातंत्र्यानंतर महिला सबलीकरण, हरितक्रांती, उद्योगधंद्यांचा विकास, अण्वस्त्र चाचणी, इस्त्रो, भारतीय सैन्य यापासून ते भारतीय अध्यात्म असे अनेक आयाम हे नाटयप्रसंगातून सादर झाले.
एस.पी.एम.इंग्लिश स्कूलच्या बालवाडी ते ९ वी पर्यंतचे ११०० विद्यार्थी व विद्यार्थीनी यामध्ये सहभाग घेतला. महानाट्यामध्ये नांदी, भारुड, बुरगुंडा, पोवाडा, सवालजवाब, मंगळागौरीचे खेळ, धनगरी नृत्य, शेतकरी नृत्य, वारीचे अभंग, बतावणी आदींद्वारे भारतीय लोककलेचे दर्शन देखील झाले. महानाटयाची संकल्पना शाळेच्या मुख्याध्यापिका रमा कुलकर्णी यांची आहे.