लाडकी बहीण योजनेचे जे सत्य आहे, ते महाराष्ट्रातील जनतेच्या समोर आणावे, सुप्रिया सुळेंची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 18:34 IST2025-07-26T18:33:30+5:302025-07-26T18:34:21+5:30
योजनेचे सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या व अर्ज भरून घेण्याची जबाबदारी असलेल्या ठेकेदाराची चौकशी करावी

लाडकी बहीण योजनेचे जे सत्य आहे, ते महाराष्ट्रातील जनतेच्या समोर आणावे, सुप्रिया सुळेंची मागणी
पुणे: लाडकी बहीण योजनेचा लाभ पुरुषांनी घेतल्याचे उजेडात आले आहे. घाईघाईने या योजनेचे जास्तीत जास्त अर्ज भरण्यात आले. यामागे खूप मोठे षडयंत्र असून योजनेचे अर्ज भरून घेण्याची जबाबदारी असलेल्या आणि या योजनेसाठी सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या ठेकेदाराची ईडी, सीबीआय व एसआयटीमार्फत चौकशी करावी, यातील जे सत्य आहे, ते महाराष्ट्रातील जनतेच्या समोर आणावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली. निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झाल्याने निवडणुकीत महायुतीला फायदा झाला. बहुमताने सरकार सत्तेवर आले. आता सरकारने योजनेसाठी आलेल्या अर्जांची छाननी सुरू केली असून या छाननीमध्ये तब्बल १४ हजार २९८ पुरुषांनी २१.४४ कोटींचा लाभ घेतल्याचे वृत्त शनिवारी लोकमतने प्रसिद्ध केले. या वृत्ताचा दाखला देत या योजनेचे सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या व अर्ज भरून घेण्याची जबाबदारी असलेल्या ठेकेदाराची चौकशी करण्याची मागणी सुळे यांनी शनिवारी पुण्यातील पत्रकार परिषदेत केली. त्यांनी यावेळी इतर विषयावरही आपली मते मांडली.
मंत्री संजय शिरसाट व राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यातील वादावर बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, एकीकडे लाडकी बहीण योजना राबवायची आणि दुसरीकडे राज्यमंत्री महिलेस विरोध करायचा, ही दुटप्पी भुमिका योग्य नाही. राज्यमंत्री मिसाळ या मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने काही निर्णय घेत असतील, त्या स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतील तर इतरांनी विरोध करण्याचे कारण नाही. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी दुसरे कोणी करण्यापेक्षा त्यांनीच नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्या, अशी मागणीही यावेळी सुळे यांनी केली.