विरोधात काम करणाऱ्यांना शिल्लक ठेवायचेच नाही असा प्रकार देशात सुरू; सपकाळांची सरकारवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 20:20 IST2025-07-16T20:19:31+5:302025-07-16T20:20:17+5:30
सरकारचे हे कारस्थान जनतेला आता समजले आहे, त्यातूनच क्रांती होईल व त्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे

विरोधात काम करणाऱ्यांना शिल्लक ठेवायचेच नाही असा प्रकार देशात सुरू; सपकाळांची सरकारवर टीका
पुणे: संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड अक्कलकोटमध्ये एका कार्यक्रमासाठी गेले असताना तिथे त्यांच्यावर शाई फेकण्यात आली व धक्काबुक्की केली. त्यासंदर्भात पुण्यात बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत गायकवाड यांनी मंत्री बावनकुळे हेच या हल्ल्यामागे असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनतर त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुधवारी त्यांच्या पुणे दौऱ्यात भेट घेतली.
देशात व राज्यातही वैचारिक काम करणाऱ्यांची गळचेपी केली जात असल्याची प्रतिक्रिया सपकाळ यांनी या संदर्भात बोलताना व्यक्त केली. याआधी विवकवादाची मांडणी करणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर, वैचारिक मांडणी करणारे गोविंद पानसरे यांच्या भर रस्त्यात हत्या झाल्या. त्याचे आरोपी अजूनही पोलिसांना सापडलेले नाहीत. आता गायकवाड यांच्यावर हल्ला झाला. विरोधात काम करणाऱ्यांना शिल्लक ठेवायचेच नाही असा प्रकार देशात सुरू आहे असे सपकाळ म्हणाले. हे कारस्थान जनतेला आता समजले आहे, त्यातूनच क्रांती होईल व त्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे असे सपकाळ म्हणाले.
कार्यक्रमाच्या आयोजकांनी या हल्ल्याची दखल घेतली नाही - प्रवीण गायकवाड
भारतीय जनता पक्षाला संभाजी ब्रिगेड बहुजन समाजासाठी करत असलेले काम पसंत नाही. त्यामुळेच आम्हाला संपवण्याचा डाव त्यांनी आखला होता. या घटनेतील आरोपी दीपक काटे व बावनकुळे यांच्यातील संभाषणाचे व्हिडीओ-ऑडिओ पुरावे समोर आलेत. समाजमाध्यमांवरून ते व्हायरल झालेत. काटे याला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्रीही आहेत. बावनकुळे व आरोपी दीपक काटे यांचे संबंध दाखवणारे पुरावे समोर आले. तो भाजपचा कार्यकर्ता आहे हे त्यातून स्पष्ट दिसते आहे. आता त्याच्यावर कारवाई होईल हे पाहण्याची जबाबदारी फडणवीस यांचीच आहे. संघटनेच्या नावात छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख आहे, या आक्षेपात काहीही अर्थ नव्हता. समाजातील कोणाही विवेकी व्यक्तीच्या ते लक्षात येईल. तरीही त्यांचे म्हणणे समजून घेऊन आम्ही त्यांना या बदलातील तांत्रिक अडचण सांगितली होती. पण तरीही हल्ला करण्यात आला. सोलापूरमधील ज्या कार्यक्रमाला मी गेलो होतो, त्या कार्यक्रमाच्या आयोजकांनी या हल्ल्याची दखल घेतली नाही, हेही दु:खद असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.