ताबा सुटल्याने ट्रॅक्टर पलटी; शेतकऱ्याचा जागीच मृत्यू, आंबेगाव तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 18:46 IST2023-06-23T18:45:55+5:302023-06-23T18:46:06+5:30
ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने शेतकऱ्याचा जागेवरच मृत्यू झाला

ताबा सुटल्याने ट्रॅक्टर पलटी; शेतकऱ्याचा जागीच मृत्यू, आंबेगाव तालुक्यातील घटना
निरगुडसर : वळती (ता. आंबेगाव) गावाच्या हद्दीत काटवान वस्ती परिसरात खोल खड्ड्यात ट्रॅक्टर पलटी होऊन तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.२२ ) रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. संतोष गेणभाऊ जुंदरे (वय ४८ ) असे मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, संतोष गणभाऊ जुंदरे हे स्वतः च्या मालकीचा ट्रॅक्टर घेऊन गुरुवारी (दि.२२ ) रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कालव्याच्या रस्त्याने घरी चालले होते. अचानक त्यांचा ट्रॅक्टर वरिल ताबा सुटून रस्त्याच्या पश्चिमेला असलेल्या मोठ्या खड्ड्यात ट्रॅक्टर पलटी झाला. संतोष जुंदरे हे ट्रॅक्टर खाली सापडल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. त्यावेळी पाठीमागून शिवाजी किसन लोखंडे हे आले. त्यांनी तातडीने स्थानिक शेतकऱ्यांना तेथे बोलावून घेतले. जुंदरे यांना ट्रॅक्टरच्या खालून काढण्याचा प्रयत्न केला. परंतु संतोष जुंदरे यांचा जागीच मृत्यू झाला होता. गावचे पोलीस पाटील प्रकाश लोंढे यांना घटनेची खबर दिली त्यानंतर मंचर पोलीस ठाण्याचे पोलिस नाईक शेखर भोईर, पोलिस कॉन्स्टेबल अविनाश दळवी, पोलिस पाटील प्रकाश लोंढे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.