राजगुरुनगर : खेड जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश ए. एस. सय्यद यांच्या सातकरस्थळ येथील देव्हरकर कॉलनीतील बंद बंगल्याच्या मुख्य दरवाजाचा कडी - कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील रोख रक्कम, सोने आणि महत्त्वाची कागदपत्रे असा एकूण २ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे.
खेड पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार दि. ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबरदरम्यान या कालावधीत जिल्हा न्यायाधीश ए. एस. सय्यद यांच्या ज्ञानदीप पंतस्मृती या बंगल्यामध्ये कोणीही नसल्याचा अंदाज घेत चोरट्यांनी बंगल्याच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील कपाटाचे लॉकर उचकटून रोख रक्कम १५ हजार रुपये, दोन लाख दहा हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेली. दरम्यान, न्यायाधीश सय्यद यांच्याच घरी चोरी झाली नाही तर सातकरस्थळ - तिन्हेवाडी रोड येथील विनिता मंगेश बागते यांच्याही दरवाजाची चौकट तोडून घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्याने डल्ला मारला. शेजारीच गजानन बबन सुतार यांच्या घराचा दरवाजा तोडून कपाटातील अंदाजे दोन तोळे वजनाच्या सोन्याच्या ४ अंगठ्या चोरट्यांनी लांबविल्या. निर्मला संतोष विरणक यांच्याही घराचा कडी कोयंडा उचकटून घरातील अंदाजे दीड तोळा वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम १७ हजार पाचशे रुपये चोरून नेले. गेल्या काही दिवसांपासून राजगुरुनगर शहर परिसरात मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना वाढल्या असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.