चोराला पकडले पण काळाने गाठले; पाठलाग करताना हृदयविकाराने तरुणाचा मृत्यू, मुळशीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 15:22 IST2024-10-10T15:20:06+5:302024-10-10T15:22:39+5:30
चोरीचा पाठलाग करताना दगदग आणि दमछाक झाल्यामुळे तरुणाला अस्वस्थ वाटू लागले, रुग्णालयात दाखल केले असता हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले

चोराला पकडले पण काळाने गाठले; पाठलाग करताना हृदयविकाराने तरुणाचा मृत्यू, मुळशीतील घटना
कोळवण: पौड ( ता.मुळशी ) येथील विठ्ठलवाडी फाटा ( ओंबळेवाडा ) येथे चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या चोराला पाठलाग करून पकडले. मात्र, चोराचा पाठलाग करताना हृदयविकारामुळे एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अक्षय अंकुश ओबळे (वय २७) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विठ्ठलवाडी फाटा येथे राजेंद्र ओंबळे हे मंगळवारी रात्री झोपलेले असताना त्यांना घराच्या मागील बाजूच्या दरवाजातून कोणीतरी आत आल्याचा आवाज आला. ओंबळे यांनी आजूबाजूला राहणाऱ्यांना या घटनेची माहिती फोनवरून दिली. नंतर या सर्व जणांनी या चोरी करणाऱ्याला गाठले. यातील तीनजण एका दिशेला पळून गेले तर एक शरद काळे दुसऱ्या बाजूला पळाला. दुसऱ्या बाजूला पळालेल्या शरद याचा नागरिकांनी पाठलाग केला असता तो नागरिकांना सापडला. यावेळी चिडलेल्या नागरिकांनी त्याला लाथा व बुक्क्याचा प्रसाद देत पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान, शरद काळे याचा पाठलाग करणाऱ्यांमध्ये अक्षय ओंबळे याचाही समावेश होता. दगदग आणि दमछाक झाल्यामुळे अक्षयला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्याला पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र तत्पूर्वी त्याचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.