मनोज जरांगेंच्या 'त्या' व्हायरल फोटोमागील स्टोरी; मध्यरात्री साडेतीन वाजताचं क्लिक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 04:27 PM2024-01-24T16:27:41+5:302024-01-24T18:13:32+5:30

जरांगे पाटलांच्या मोर्चाला आज सकाळी वाघोलीपासून सुरुवात झाली आहे.

The Story Behind Manoj Jarange's 'That' Viral Photo in pune; The click of 3:30 in the middle of the night | मनोज जरांगेंच्या 'त्या' व्हायरल फोटोमागील स्टोरी; मध्यरात्री साडेतीन वाजताचं क्लिक

मनोज जरांगेंच्या 'त्या' व्हायरल फोटोमागील स्टोरी; मध्यरात्री साडेतीन वाजताचं क्लिक

मुंबई - मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीतून आपला मोर्चा घेऊन उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले आहेत. जरांगे पाटलांचा रॅली आज पुण्यनगरीत पोहोचली. पुण्याच्या वेशीवरच जरांगेच्या स्वागताला मोठी गर्दी जमली होती. मराठा समाज बांधव जरांगेची वाट पाहात मध्यरात्रीही रस्त्यावर रांग लावून उभे होते. दिवसभर प्रवास आणि मराठा समाज बांधवांच्या भेटी घेत जरांगे मार्गक्रमण करत आहेत. गावोगावी, गल्लोगल्ली त्यांचं स्वागत होत आहे. महिलाही औक्षणाचं ताट घेऊन त्यांच्या स्वागताला येत आहेत. सध्या, जरांगे यांचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तो फोटो नेमका कधीच आणि कसा क्लिक झाला हेही आंदोलनाची जागरुकता दर्शवणारं आहे. त्यानुसार, हा फोटो कटकेवाडीत असताना क्लिक झाल्याचं एका व्हिडिओवरुन दिसून येते.

जरांगे पाटलांच्या मोर्चाला आज सकाळी वाघोलीपासून सुरुवात झाली आहे. हातात झेंडे, डोक्यावर भगव्या टोप्या, एका मराठा लाख मराठाच्या पताका, टाळ - मृदंगाचा गजर करत नागरिक मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. खराडीपासून मोर्चा ज्याप्रमाणे पुढे जाईल. तशी वाहतूक सुरळीत केली जात आहे. पोलिसांचाही मोठा फौजफाटा बंदोबस्तात दिसून येत आहे. त्यातच, सोशल मीडियातूनही जरांगेंच्या पुण्यातील मोर्चाची आणि गर्दीची चर्चा रंगली आहे. यात, एक फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, मनोज जरांगे पाटील गाडीत झोपल्याचे दिसून येते, त्यावेळी कारमधील त्यांच्या सहकाऱ्याने त्यांचं डोकं अलगद धरल्याचं पाहायला मिळतं. मनोज जरांगे यांचा हा फोटो नेमका कधीचा आणि कुठे क्लिक झाला, तो प्रसंग काय होता, याची माहिती एका व्हिडिओतून समोर येत आहे. 

''हा व्हिडीओ आमच्या कटकेवाडी चौकामधील आहे, कटकेवाडी चौकामध्ये यायला पाटलांना पहाटे साडेतीन वाजले होते. काय म्हणायचं पाटलांच्या सहनशीलतेला,'' असे म्हणत प्रसाद देठे यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, मनोज जरांगे गाडीमध्ये झोपलेले दिसून येतात. मात्र, त्यांच्या स्वागतासाठी जमलेले मराठा बांधव त्यांचे औक्षण करु इच्छितात. यावेळी, महिला भगिनींच्या हाती औक्षणासाठीची थाळीही दिसून येते. मात्र, जरांगे पाटील यांच्यासमवेतच सहकारी त्यांना आराम करु द्या, ते खूप थकले आहेत, असे सांगत समाज बांधवांना समजावताना दिसत आहेत. दरम्यान, जरांगे पाटील गाडीतच अलगदपणे आपली मान दुसरीकडे टाकताना दिसून येतात, त्याचवेळी कारमधील त्यांचे सहकारी मनोज जरांगे यांना अलगद पकडत असल्याचे दिसते. याच क्षणाचा हा फोटो आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कटकेवाडीपासून काही अंतरावरील वाघोलीजवळी हा फोटो आहे, जेव्हा गाडीत पाटील झोपले होते, असे प्रसाद देठे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. जरांगे पाटील यांचं आंदोलनातील योगदानाचं, त्यांच्या समाजासाठीच्या त्यागाचं कार्य दर्शवणारा हा फोटो सोशल मीडियातून शेअर केला जात आहे. 

दरम्यान, जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है, एक मराठा कोटी मराठा, आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे अशा घोषणा देत हजारो मराठा बांधव पुणे शहरात दाखल झाले आहेत. शहरात अनेक चौकात जरांगे पाटलांचं जंगी स्वागत केलं जातंय. लाखो मराठा बांधव आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी मुंबईला चालले आहेत. त्यांना आरक्षण द्यावंच लागेल, आम्ही हक्काचं आरक्षण मागतोय, भीक मागत नाहीये, अशा प्रतिक्रियाही मराठा बांधवांनी दिल्या आहेत.

Web Title: The Story Behind Manoj Jarange's 'That' Viral Photo in pune; The click of 3:30 in the middle of the night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.