राज्यात सरासरीच्या ९३.६ टक्के पाऊस; पूर्व विदर्भ,मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 17:21 IST2025-06-29T17:20:32+5:302025-06-29T17:21:06+5:30

कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आतापर्यंत ७६ लाख ३१ हजार हेक्टरवरील (५३ टक्के) खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

The state received 93.6 percent of the average rainfall; East Vidarbha and Marathwada received less rainfall. | राज्यात सरासरीच्या ९३.६ टक्के पाऊस; पूर्व विदर्भ,मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी

राज्यात सरासरीच्या ९३.६ टक्के पाऊस; पूर्व विदर्भ,मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी

पुणे : राज्यात पूर्व विदर्भ व मराठवाड्याचा अपवाद वगळता मान्सूनने जून महिन्याची सरासरी गाठली आहे. अजूनही दोन दिवस शिल्लक असून, सरासरी इतका पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यात जूनमध्ये सरासरी २०८ मिलिमीटर पाऊस पडतो. त्या तुलनेत शनिवारपर्यंत (दि. २८) १९४.३ मिलिमीटर अर्थात ९३.६ टक्के पाऊस झाला आहे.

चार तालुक्यांमध्ये २५ टक्क्यांपेक्षा कमी पावसाची नोंद झाली असून, २५ ते ५० टक्के पाऊस असणाऱ्या तालुक्यांची संख्या ३८ इतकी आहे. तर ७५ ते १०० टक्के पाऊस ८७ तालुक्यांमध्ये झाला असून, १५५ तालुक्यांमध्ये पावसाने सरासरीच्या शंभर टक्क्यांहून अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे. कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आतापर्यंत ७६ लाख ३१ हजार हेक्टरवरील (५३ टक्के) खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

राज्यात जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. आतापर्यंत एकूण २१ दिवस पावसाची नोंद करण्यात आली आहे. जून महिन्यात राज्यात २०७.६ मिलिमीटर सरासरी पाऊस पडतो. त्यानुसार आतापर्यंत १९४.३ मिलिमीटर अर्थात ९३.६ टक्के पाऊस नोंदविण्यात आला आहे. पूर्व विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या केवळ ६१ टक्के पाऊस झाला आहे. तर मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांमध्ये ८३.६ टक्के पाऊस झाला आहे. राज्यात सर्वाधिक पाऊस पुण्यात ११३ टक्के तर कोकण विभागात १०२, नाशिक विभागात १०१, अमरावती विभागात १०८ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, २८ जूनपर्यंत राज्यातील चार तालुक्यांमध्ये २५ टक्क्यांपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. यात भंडाऱ्यातील लाखनी व गोंदियातील सालेकसा, देवरी व सडक अर्जुनी या तीन तालुक्यांचा समावेश आहे. तर २५ ते ५० टक्के पाऊस राज्यातील १५ जिल्ह्यांमधील ३८ तालुक्यांमध्ये नोंदविण्यात आला आहे. यात नागपूर आणि बीड जिल्ह्यामधील प्रत्येकी पाच तालुक्यांचा समावेश आहे. तर ५० ते ७५ टक्के पावसाची नोंद राज्यातील २० जिल्ह्यांमधील ७१ तालुक्यांमध्ये करण्यात आली आहे. तर ७५ ते १०० टक्के पाऊस ३० जिल्ह्यांमधील ८७ तालुक्यांमध्ये पडला आहे. १०० टक्क्यांहून अधिक पाऊस २८ जिल्ह्यांमधील १५५ तालुक्यांमध्ये नोंदविण्यात आला आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून विदर्भात सुरू असलेल्या पावसामुळे खरीप पेरण्यांना वेग आला आहे. राज्यात आतापर्यंत लातूर जिल्ह्यात ७९, धाराशिव, सोलापूर व संभाजीनगर जिल्ह्यात प्रत्येकी ७६ व जालना जिल्ह्यात ७० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सर्वात कमी पेरणी झालेल्या पाच जिल्ह्यांमध्ये ठाणे (०.२ टक्के), भंडारा (१ टक्के), गोंदिया (२ टक्के), पालघर (६ टक्के) व रायगड (७ टक्के) या जिल्ह्यांचा समावेश आहे. सर्वाधिक पेरणी झालेल्या पाच पिकांमध्ये मका (८६ टक्के), उडीद (६६ टक्के), सोयाबीन (६२ टक्के), कापूस (५८ टक्के) व तूर (५० टक्के) यांचा समावेश आहे.

Web Title: The state received 93.6 percent of the average rainfall; East Vidarbha and Marathwada received less rainfall.