Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 20:50 IST2024-10-14T20:47:11+5:302024-10-14T20:50:21+5:30
या प्रकरणातील तिसरा आरोपी अद्याप फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
Pune Rape Case ( Marathi News ) : पुण्यातील कोंढवा परिसरातील बोपदेव घाटात मित्रासोबत गेलेल्या तरुणीवर सामूहिक अत्याचाराची घटना घडली होती. याप्रकरणी तीन आरोपींपैकी एका आरोपीला यापूर्वीच अटक करण्यात आल्यानंतर आता दुसऱ्या आरोपीला पोलिसांनीउत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून बेड्या ठोकल्या आहेत. तसंच या प्रकरणातील तिसरा आरोपी अद्याप फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोपदेव घाटात तरुणीवर अत्याचार केल्यानंतर तीन आरोपींपैकी दोन आरोपी फरार झाले होते. पोलिसांकडून या आरोपींचा कसून शोध घेतला जात होता. अशातच आरोपींच्या मागावर पोलिसांचे एक पथक उत्तर प्रदेशात रवाना झाले होते. आज या प्रकरणातील आणखी एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं असून तिसऱ्या आरोपीचा शोध घेतला जात आहे.
पहिल्या आरोपीला उद्यापर्यंत पोलीस कोठडी
पहिल्या आरोपीला येवलेवाडी परिसरातून अटक केल्यानंतर कोंढवा पोलिसांनी त्याला शनिवारी दुपारच्या सुमारास शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले होते. "बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणातील आरोपींनी केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. अटक आरोपीची वैद्यकीय तपासणी करायची असून त्याचा डीएनए अहवाल प्राप्त करायचा आहे. आरोपींनी पीडितेकडे असलेली चेन चोरली असून, ती जप्त करायची आहे," असं सांगत सरकारी वकिलांनी या प्रकरणात अटक केलेल्या आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. ती मान्य करत न्यायालयाने २५ वर्षीय आरोपीला १५ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे.
'त्या' रात्री बोपदेव घाटात नेमकं काय घडलं?
कोंढव्यातील बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या महाविद्यालयीन तरुणीवर तिघांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. पीडित तरुणी मूळची सुरतमधील आहे. तिचा मित्र जळगावमधील आहे. दोघे एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. गुरुवारी (दि. ३) रात्री तरुणी आणि तिचा मित्र बोपदेव घाट परिसरात फिरायला गेले होते. रात्री ११ च्या सुमारास तरुणी आणि तिचा मित्र घाटात गप्पा मारत थांबले होते. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना धमकावले. तरुणीला धमकावून तिघांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिघे जण पसार झाले. घाबरलेल्या तरुणीला मित्राने रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालय प्रशासनाने याबाबतची प्राथमिक वैद्यकीय माहिती कोंढवा पोलिसांना दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी तातडीने तपास करण्याचा आदेश देण्यात आला. शुक्रवारी सकाळी याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.