पुण्यात वाहनांच्या तोडफोडीचे सत्र सुरूच...! बिबवेवाडीत तब्बल पंचवीस गाड्यांची तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 15:07 IST2025-02-05T15:07:21+5:302025-02-05T15:07:54+5:30
बिबवेवाडी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह दोघांही आरोपींना वेल्हा तालुक्यातून पाबे घाटातून ताब्यात घेतले

पुण्यात वाहनांच्या तोडफोडीचे सत्र सुरूच...! बिबवेवाडीत तब्बल पंचवीस गाड्यांची तोडफोड
- शिवाजी यादव
बिबवेवाडी : पुणे शहरातील वाहनांच्या तोडफोडीचे सत्र काही थांबण्याचे नाव घेत नाही, बि.टी. कवटे रस्ता, दत्तवाडी, लक्ष्मीनगर, पर्वती परिसरात गाड्यांच्या तोडफोडीची घटना ताजी असतानाच पुण्यातील बिबवेवाडी परिसरात तिघांनी दहशत माजविण्यासाठी हुल्लडबाजी करत धारदार शस्त्राने पंचवीस वाहनांची तोडफोड केली. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह दोघांही आरोपींना वेल्हा तालुक्यातून पाबे घाटातून ताब्यात घेतले असून बिबवेवाडी परिसरातून त्यांची धिंड काढण्यात आली. अभिषेक पांढरे वय २३ वर्ष गणराज सुनील ठाकर, वय २३ वर्ष असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास पांढरे, ठाकर व एक अल्पवयीन मुलगा दुचाकीवर ट्रिपल सिट आले होते, त्यांच्या हातात धारदार शस्त्र होती. अप्पर इंदिरानगर परिसरातील दुर्गा माता मंदिर परिसरात मध्यरात्री आलेल्या व रस्त्या च्या कडेला लावलेल्या दुचाकी, टेम्पो, रिक्षांची धारदार शस्त्राने व दांडक्याने तोडफोड केली. टोळक्याने शिवीगाळ करुन दहशत माजविली. वाहन तोडफोडीचा आवाज ऐकल्यानंतर नागरिकांनी आरडाओरडा केला. टोळके तेथून पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच बिबवेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेत असताना आरोपी पाबे घाटात असल्याची माहिती मिळाली, माहिती मिळताच सहकारनगर पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने तिघांनाही ताब्यात घेतले.
कोणतेही कारण नसताना भागात दहशत निर्माण व्हावी या उद्देशाने या तिघांनी मोठ्या प्रमाणावर गाड्यांची धारधार शस्त्राने तोडफोड केली आहे. याप्रकरणी टोळक्याविरुद्ध बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर साळुंखे यांनी दिली. तर पोलीस उपयुक्त राजीवकुमार शिंदे यांनी अशी दहशत पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करू व त्यांना सळो कि पळो करून सोडू. कोणीही कायदा हातात घेतला तर त्याचे कंबरडे मोडले जाईल असा इशाराही त्यांनी दिला.
दोन दिवसांपूर्वी बिबवेवाडीत वैमनस्यातून सराइतावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला होता. माधाव वाघाटे खून प्रकरणात बदला घेण्या साठी जामीन मिळवून कारागृहातून बाहेर पडलेल्या सराइतावर गोळीबार करण्यात आला होता. पाठोपाठ झालेल्या तोडफोडीच्या घटनेमुळे परिसरात भिंतीचे वातावरण असून कायदा व सुव्यवस्था ढासळली जात असल्याचे दिसून येत आहे.