दहशतीचा कोयता आता शाळकरी मुलांच्या हातात! बारामतीत एकावर वार…
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 12:32 IST2025-01-26T12:31:22+5:302025-01-26T12:32:16+5:30
३ हल्लेखोर अल्पवयीन मुलांची बाल न्यायालयात रवानगी

दहशतीचा कोयता आता शाळकरी मुलांच्या हातात! बारामतीत एकावर वार…
सांगवी (बारामती ) : पणदरे (ता.बारामती) येथील विद्यालयात एकमेकांकडे बघण्यावरून अल्पवयीन मुलांच्या दोन गटात वाद झाला होता, तो वाद मिटविण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या युवकावर कोयत्याने वार होऊन जखमी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत फिर्यादी निलेश रामदास जगदाळे (वय २१) रा. जगताप आळी पणदरे ता बारामती, जि.पुणे) यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर तीन अल्पवयीन हल्लेखोर मुलांना माळेगाव पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी पुण्यातील बाल न्यायालयात रवानगी केली आहे.
पणदरे (ता.बारामती) येथे हद्दीत काल शनिवार (दि.२५) रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी निलेश रामदास जगदाळे हे पणदरे येथील नवमहाराष्ट्र विदयालय पणदरे येथील कॉलेज समोरून रस्त्याने जात असताना महाविद्यालयाच्या गेटच्या आत मुलामुलामध्ये भांडण सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर फिर्यादी यांनी गेटच्या आतमध्ये जावून पाहिले असता तेथे पणदरे गावातील अल्पवयीन मुलांची एकमेकांकडे पाहण्यावरून भांडण सुरू होते.
अल्पवयीन मुलांची भांडणे मिटवायच्या उद्देशाने सुतगिरणी परिसरात फिर्यादी व इतर अल्पवयीन मुले जमा झाले. त्यानंतर अल्पवयीन मुलाने दुसऱ्या बाजूच्या अल्पवयीन मुलाशी भांडणे मिटवताना पुन्हा वाद झाला, या वादातून यातील एका अल्पवयीन मुलाने कोयता घेवुन फिर्यादीच्या अंगावर धावून डोक्यात वार केला असता तो वार फिर्यादीने चुकविण्याचा प्रयत्न केला, मात्र तो वार फिर्यादीच्या उजव्या खांदयावर बसला, त्यानंतर अल्पवयीन मुलाने दुसरा वार केला असता फिर्यादीने उजव्या हाताने आडविला असता फिर्यादीच्या उजव्या हाताच्या कोपरास वार लागून गंभीर जखम झाली. याबाबत माळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे.
३ हल्लेखोर अल्पवयीन मुलांना माळेगाव पोलिसांनी सदर गुन्ह्याच्या तपास कामी ताब्यात घेवून त्यांची रवानगी बाल न्यायालय पुणे येथे केली आहे. उर्वरित हल्लेखोरांचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक अमोल खटावकर करीत आहेत.