तीन एकर जागेवर साकारण्यात येणारा नियाेजित नाट्यगृहाचा प्रस्ताव उधळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 10:47 IST2026-01-07T10:46:58+5:302026-01-07T10:47:10+5:30
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निर्णय

तीन एकर जागेवर साकारण्यात येणारा नियाेजित नाट्यगृहाचा प्रस्ताव उधळला
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तीन एकर जागेवर सुसज्ज नाट्य संकुल उभारण्याचा प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेच्या मंगळवारी (दि. ६) झालेल्या बैठकीत ठेवण्यात आला हाेता. हा प्रकल्प खासगी संस्थेच्या सहकार्याने सीएसआर अंतर्गत ५ काेटी रुपये खर्च करून उभारण्यात येणार हाेता. पण, सदर प्रकल्प कसे चालवले जातील, त्याचे व्यवस्थापन काेण पाहील, त्याचे दर कसे निश्चित केले जातील, याबाबत काेणतीच स्पष्टता नव्हती. त्यामुळे सदर प्रस्ताव बैठकीत सादर हाेताच उधळून लावण्यात आला. व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनीच ही माहिती ‘लाेकमत’शी बाेलताना दिली.
दरम्यान, एका कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी विद्यापीठात सुसज्ज नाट्य संकुल उभारण्यात येईल, असे जाहीर केले हाेते. त्यासाठी खासगी संस्था आणि सीएसआर निधीचे सहकार्य घेण्यात येईल, असेही स्पष्ट केले हाेते. त्याचदृष्टीने मंगळवारच्या बैठकीत प्रस्ताव मांडला गेला. पण, पाच काेटींच्या सीएसआर निधीसाठी विद्यापीठाची दाेनशे काेटींची जागा खासगी संस्थेच्या स्वाधीन करणे अवैध असल्याचे सांगून त्याला काही सदस्यांनी विराेध दर्शविला हाेता. याबाबत दैनिक ‘लाेकमत’ने ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तीन एकर जागेवर खासगी ट्रस्टचा डाेळा’ या शिर्षकाने वृत्त प्रसिद्ध केले हाेते. अखेर प्रस्ताव सादर हाेताच सर्व सदस्यांनी प्रश्नांचा भडीमार केला आणि सदर नियाेजित प्रस्ताव उधळला गेला, अशी माहिती सदस्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर दिली.
एका खासगी संस्थेला जागा देण्यासाठी कुलगुरूंवर दबाव टाकला जात आहे, असा आराेपही केला जात हाेता. पण, काेणताही दबाव नाही. संयुक्त उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने काही प्रस्ताव आले आहेत. त्यावर अद्याप काेणताही निर्णय झालेला नाही, अशी माहिती कुलगुरूंनी दिली हाेती.
विद्यापीठात नाट्यसंकुल उभारण्याचा प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेत सादर करण्यात आला. त्यावर नियाेजन आराखडा आणि व्यवस्थापन याबाबत चर्चा झाली. नाट्यगृहाचा सविस्तर कृती आराखडा सादर झाल्यानंतरच यावर पुढील चर्चा हाेईल, असा निर्णय व्यवस्थापन परिषदेत घेण्यात आला. - डाॅ. सुरेश गाेसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ