Satish Wagh Case: सतीश वाघ यांच्यावर जादूटोणा करण्यास मांत्रिकाला सांगितले; खळबळजनक माहिती समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 16:34 IST2025-03-15T16:30:50+5:302025-03-15T16:34:59+5:30
वाघ यांचा खून करण्याची सुपारी सराईत गुन्हेगार पवन शर्मा, नवनाथ गुरसाळे आणि विकास शिंदे यांना अक्षयने दिली होती

Satish Wagh Case: सतीश वाघ यांच्यावर जादूटोणा करण्यास मांत्रिकाला सांगितले; खळबळजनक माहिती समोर
पुणे : पती सतीश वाघ यांचा अनैतिक संबंधातील अडसर दूर करण्यासाठी मोहिनीने वर्षभरापूर्वी एका मांत्रिकाची भेट घेतली होती. वाघ यांच्यावर जादूटोणा करण्यास तिने मांत्रिकाला सांगितले होते. खून करण्यापूर्वी वर्षभरापासून आरोपींनी वाघ यांच्यावर पाळत ठेवली होती. आरोपी अक्षयने वाघ यांचा खून करण्याची सुपारी सराईत गुन्हेगार पवन शर्मा, नवनाथ गुरसाळे आणि विकास शिंदे यांना दिली होती. तिघांनी त्यांचा खून करण्यासाठी प्रयत्न केले होते. असे पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे
आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या खून प्रकरणात पुणेपोलिसांच्या गुन्हे शाखेकडून लष्कर न्यायालयात एक हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले. वाघ यांच्या खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अक्षय जावळकर आणि वाघ यांची पत्नी मोहिनी असल्याचे पोलिसांनी केलेल्या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. वाघ यांचा खून करण्यापूर्वी पत्नी माेहिनी हिने एका मांत्रिकाची भेट घेतली होती. तिने पती सतीश यांच्यावर जादूटोणा करण्यास मांत्रिकाला सांगितले होते, असे पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे.
सतीश तात्याबा वाघ (५८, रा. फुरसुंगी, हडपसर-सासवड रस्ता) यांचे अपहरण करून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना ९ डिसेंबर २०२४ राेजी घडली होती. नेहमीप्रमाणे सकाळी वाघ फिरायला निघाले होते. सासवड रस्त्यावर त्यांना धमकावून त्यांचे कारमधून अपहरण करण्यात आले होते. उरुळी कांचन परिसरातील शिंदवणे घाटात वाघ यांच्यावर शस्त्राने तब्बल ७२ वार करून खून करण्यात आला होता. त्यांचा मृतदेह घाटात फेकून आरोपी पसार झाले होते. या प्रकरणात सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी, अक्षय जावळकर, आतिश जाधव, पवन शर्मा, नवनाथ गुरसाळे, विकास शिंदे यांना अटक करण्यात आली होती. वाघ यांच्या मुलाने याबाबत हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
अक्षय आणि मोहिनी यांनी संगनमत करून कट रचला
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींविरुद्ध गुन्हे शाखेने एक हजार पानांचे आरोपपत्र लष्कर न्यायालयात दाखल केले. माेहिनी वाघ आणि अक्षय जावळकर हे २०१३ मध्ये एकमेकांच्या संपर्कात आले. अक्षय हा वाघ यांच्या खोलीत भाडेतत्त्वावर राहत होता. अक्षयने वाघ यांच्या मुलाला महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते. अक्षय आणि पत्नी मोहिनी यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले. सतीश वाघ यांना संशय आला होता. त्यामुळे त्यांनी पत्नी माेहिनी हिच्याकडील आर्थिक व्यवहार काढून घेतले. त्यानंतर अक्षय याने दुसरीकडे घर घेतले. अक्षय आणि मोहिनी यांनी संगनमत करून वाघ यांचा खून करण्याचा कट रचला.
पाच लाखांची सुपारी..
सतीश वाघ यांचा खून करण्यासाठी अक्षय याने पाच लाखांची सुपारी दिली होती. हे पैसे अक्षयने जमवले हाेते. सुरुवातीला त्याने आरोपींच्या बँक खात्यावर दीड लाख रुपये पाठवले होते. सराईत गुन्हेगार शर्मा आणि साथीदारांनी वाघ यांचा खून केल्यानंतर ९ डिसेंबर २०२४ रोजी अक्षयने उर्वरित रक्कम वाघोलीत दिली होती. वाघ यांच्यानंतर सर्व आर्थिक व्यवहार माेहिनीकडे येणार होते. त्यामुळे दोघांनी सुपारी देऊन खून केल्याचे तपासात उघडकीस आले होते.
या प्रकरणात पोलिसांनी न्यायवैद्यकीय पुरावे गोळा केले, तसेच आरोपी, फिर्यादी, साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. वाघ यांचा मोबाइल, गुन्ह्यात वापरलेली कार, शस्त्रे जप्त करण्यात आली होती. पोलिस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थविरोधी पथकाने वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड आणि पथकाने या प्रकरणाचा तपास करून आरोपपत्र दाखल केले.