विरोधक खालच्या पातळीवर जाऊन अतिशय घमेंडखोरीने बोलतात, हे आता बदलायचं - अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 17:26 IST2025-11-14T17:20:45+5:302025-11-14T17:26:15+5:30
ग्रामपंचायतसारखे राजकारण करू नका. तुम्ही माझे ऐकाल तरच मी तुमचे ऐकेल, अन्यथा तुम्हाला कोणीही वाली राहणार नाही

विरोधक खालच्या पातळीवर जाऊन अतिशय घमेंडखोरीने बोलतात, हे आता बदलायचं - अजित पवार
माळेगाव : माळेगाव टप्प्याटप्प्याने बारामती शहराप्रमाणे ‘रोल माॅडेल’ करायचं आहे. माळेगाव ग्रामपंचायत काळात अनेक गटातटाचे, भावकीचे व बेटाचे राजकारण चालत होते. इथून मागील माझा अनुभव चांगला नाही. अनेक गट-तट यांनी माळेगावातील राजकारण खराब करू नये, अन्यथा अजित पवार यांच्याशी गाठ आहे, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.
उपमुख्यमंत्री पवार यांनी बारामतीत कार्यकर्ता मेळाव्यात माळेगाव नगरपंचायतमध्ये कोणीही गटातटाचे राजकारण करू नये, असे आवाहन केले. नगराध्यक्षपदासह १८ उमेदवार आहेत, हे १८ उमेदवार म्हणजेच अजित पवार आहे, असे समजून माळेगावकरांनी मतदान करावे. नगरपंचायत माळेगावसाठी ५ वर्षांत ३३४ कोटी रुपये इतका मोठा निधी दिल्याचे सांगितले. माझ्या विचाराची नगरपंचायत निवडून दिल्यानंतरच विकास करणे शक्य आहे. त्यामुळे विकास करायचा की गटातटाचं राजकारण करायचं हे तुम्ही ठरवा, कारण मी कामाचा माणूस आहे. कोट्यवधी रुपये मी माळेगावसाठी देत आहे. त्याचा विनियोग चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे, याच्याकडे माझे कटाक्षाने लक्ष असेल. केवळ पैसे दिल्याने शहरं उभी राहत नाही. पैशाचा योग्य विनियोग योग्य होणे आवश्यक आहे. माळेगावमधील भावकी गावकी, बेटाचा हा माझा हा तुझा हे राजकारण मी खपवून घेणार नाही.
ग्रामपंचायतसारखे राजकारण करू नका. तुम्ही माझे ऐकाल तरच मी तुमचे ऐकेल, अन्यथा तुम्हाला कोणीही वाली राहणार नाही. निवडणुका आल्या तरच पावसाळ्यातल्या छत्रीप्रमाणे विरोधी पक्ष दिसतो. निवडणुका झाले की यांना कोणाशी सोयरसुतक नसते, असा टोला पवार यांनी विरोधकांना लगावला. माळेगावमधील विरोधी राजकारणी खालच्या पातळीवर जाऊन अतिशय घमेंडखोरीने बोलतात. त्यांच्याकडे कसलीही नीतिमत्ता नाही. माळेगावच्या जनतेचा चेहरामोहरा बदलायचा आहे. मी तुमच्या अडीअडचणीत, सुखदुःखात नेहमीच सहभागी असतो हे तुम्हाला चांगले माहीत आहे. निवडणुका म्हणजे सामूहिक जबाबदारी असते, निवडणुका म्हणजे अजित पवारांच्या घरचे लग्न नाही. तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी सामूहिक जबाबदारी घ्यावी आणि प्रचार करावा, असे आवाहन पवार यांनी केले.