HMPV Virus: नाव गुंतागुतीचं, आजार मात्र जुनाच, घाबरू नका एचएमपीव्ही हाेताेय बरा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 13:24 IST2025-01-08T13:21:23+5:302025-01-08T13:24:07+5:30
घरगुती उपचार आणि योग्य औषधाेपचारावर या आजाराचे निदान होते. त्यामुळे विनाकारण भीती बाळगू नये

HMPV Virus: नाव गुंतागुतीचं, आजार मात्र जुनाच, घाबरू नका एचएमपीव्ही हाेताेय बरा!
पुणे : ‘ह्यूमन मेटान्यूमोव्हायरस’ हा आजार तसा नवा नाही. भारतामध्ये गेल्या २५ वर्षांपासून हा आजार आहे. हा आजार श्वसन विकारांशी संबंधित असला तरी, सर्दी, खोकला अशी साधी लक्षणं आहेत. या आजाराचा परिणाम श्वसन मार्गाच्या वरच्या भागावर होतो. त्यामुळे फुप्फुसात जाऊन न्यूमोनिया होण्याचे प्रमाण कमी आहे. गेल्या वर्षी देशात आजाराचे वेगवेगळे १७२ रुग्ण सापडले होते. यामध्ये कोणीही दगावले नसून, या आजाराचे नाव अवघड असले तरी, कोणी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांकडून करण्यात आले.
विनाकारण भीती बाळगू नये
‘ह्यूमन मेटान्यूमोव्हायरस’ हा विषाणू नवा नाही. शिवाय कोरोना आणि या आजाराची तुलनासुद्धा करू शकत नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून या आजाराचे रुग्ण भारतात आढळले आहेत. गेल्या वर्षी याचे वेगवेगळे १७२ रुग्ण आढळले असून, यामध्ये कोणीही दगावले नाही. घरगुती उपचार आणि योग्य औषधाेपचारावर या आजाराचे निदान होते. त्यामुळे विनाकारण भीती बाळगू नये. - डाॅ. प्रदीप आवटे, निवृत्त, राज्य सर्वेक्षण अधिकारी
कोरोनासारखी परिस्थिती उद्भवणार नाही
हा आजार गंभीर नसून, २००४ मध्ये यासंबंधित रुग्ण आढळले आहेत. ज्येष्ठ आणि लहान मुलांना याचा क्वचित धोका होऊ शकतो. यामुळे वेगळ्या उपाययोजना करण्याची गरज नाही. नियमित वॉर्डात या रुग्णावर उपचार करू शकतो. कोविड हा आजार वेगळा होता. अशी परिस्थिती यामुळे उद्भवणार नाही. त्यामुळे कोणी घाबरून जाऊ नये. - डाॅ. यल्लपा जाधव, वैद्यकीय अधीक्षक, ससून रुग्णालय