कर्जाचा डोंगरही वाढला! १८ गायींपैकी १० गाई १ दिवसात विकल्या; अखेर तरुण शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 13:11 IST2024-12-29T13:10:44+5:302024-12-29T13:11:13+5:30
शेतकऱ्याने शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायासाठी कर्ज घेऊन गायी विकत घेतल्या होत्या, मात्र दुधाच्या दारात मोठी घसरण झाली

कर्जाचा डोंगरही वाढला! १८ गायींपैकी १० गाई १ दिवसात विकल्या; अखेर तरुण शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल
उदापूर : येथील प्रकाश (पप्पू) दत्तात्रेय सस्ते (वय ३३, रा. उदापूर, ता. जुन्नर, जि. पुणे) या तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून घराजवळच असणाऱ्या चिक्कूच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
या घटनेबाबत ओतूर पोलिस ठाण्यात प्रकाशचे वडील दत्तात्रय महादू सस्ते यांनी खबर दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास साहाय्यक पोलिस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलिस करीत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, प्रकाश सस्ते हा आपल्या शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करीत होता. गायी खरेदीसाठी त्याने जमिनीवर व पतसंस्थांकडून कर्ज तसेच काही जणांकडून हातउसने पैसेदेखील घेतले होते. परंतु, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे तसेच दुध दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यामुळे त्याचे आर्थिक गणित बिघडत चालले होते. त्याच्याकडे असणाऱ्या १८ गायींपैकी १० गाई एका दिवसात विकल्या होत्या. तरीदेखील कर्जाचा डोंगर काही कमी होत नव्हता. आई, वडील, भाऊ, बायको व दोन लहान मुले यांचे भविष्य कसे होणार याची चिंता त्याला सतावत होती. त्यामुळे प्रचंड तणावात त्याने आत्महत्या करण्याचे हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज त्याच्या नातेवाइकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.