परिवहन राज्यमंत्री यांनी स्वारगेट अत्याचार प्रकरणावर प्रतिक्रिया दिली नाही, कारण...

By राजू इनामदार | Updated: February 26, 2025 17:03 IST2025-02-26T17:03:13+5:302025-02-26T17:03:43+5:30

स्वारगेट बलात्कार प्रकरणावरून राजकीय पक्ष आक्रमक; परिवहन राज्यमंत्री वगळता अनेकांची पाहणी 

The Minister of State for Transport did not react to the Swargate atrocity case because | परिवहन राज्यमंत्री यांनी स्वारगेट अत्याचार प्रकरणावर प्रतिक्रिया दिली नाही, कारण...

परिवहन राज्यमंत्री यांनी स्वारगेट अत्याचार प्रकरणावर प्रतिक्रिया दिली नाही, कारण...

पुणे: स्वारगेट बसस्थानकावर मंगळवारी पहाटे झालेल्या बलात्कार प्रकरणावरून स्थानकाच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानकात जाऊन तोडफोड केली व प्रशासन तसेच सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. दरम्यान अनेक राजकीय महिला पदाधिकाऱ्यांनी बसस्थानकाला भेट दिली तसेच पोलिसांनी याची कठोर चौकशी करून अटक आरोपीला कडक शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली.

या परिसरात दोन वर्षे महामेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे या स्थानकातील सर्व व्यवस्थाच बिघडली आहे. प्रामुख्याने स्थानकाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे, मात्र राजकीय पुढारी, पक्ष पदाधिकारी यांच्यापैकी कोणाचेच स्थानकाच्या व्यवस्थेकडे लक्ष नाही. प्रशासन त्यांना जमेल त्याप्रमाणे, सोयीने येथील कामकाज पहात असते. रात्रीच्या सुमारास तसेच पहाटेच्या वेळेसच स्थानकामध्ये अनेक गैरप्रकार सुरू असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत.

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी बुधवारी दुपारी स्थानकाला भेट दिली. त्यांच्यासमवेत शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे शहराध्यक्ष नाना भानगिरे व अन्य कार्यकर्ते, पदाधिकारी होते. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणावरून पोलिस आयुक्तांकडे चौकशी केली. संबधित पोलिस ठाण्यातही त्यांनी संपर्क साधला. वसंत मोरे सह अन्य अन्य कार्यकर्ते, पदाधिकारी होते. 

संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल देण्याबाबत त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना सांगितले. त्याचबरोबर स्थानकात वावरताता महिला, मुलींनी अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये, त्यांनी काहीही सांगितले तरी त्यांचे ऐकू नये, कोणतीही समस्या असेल तर स्थानक प्रमुख किंवा एसटीचे जे अधिकारी उपस्थित असतील त्यांच्याशीच थेट संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले. माजी नगरसेवक ॲड. रूपाली पाटील-ठोंबरे यांनीही बसस्थानकाला भेट दिली व कायदा व सुव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली.

खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांनी याबाबत एक्सवर सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न चिंताजनक झाल्याचे म्हटले आहे. गुन्हेगारांना राज्यात कायद्याचा धाकच उरलेला नाही, आधी काही गुन्हे दाखल असलेली व्यक्ती एखाद्या स्थानकात अशी मोकाट कशी फिरू शकते असा प्रश्न खासदार सुळे यांनी उपस्थित केला. आमदार पवार यांनी या घटनेचा निषेध करत निदान आता तरी सरकारने जागे व्हावे व अशा गोष्टींना आळा बसावा म्हणून काही धोरण तयार करावे अशी मागणी त्यांनी केली.

परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ वगळता अनेक राजकीय महिला पदाधिकाऱ्यांनी बसस्थानकाला भेट दिली. मंत्री मिसाळ यांच्या पर्वती मतदारसंघातच हे स्थानक येते. त्या दौऱ्यावर परगावी गेल्या असल्याचे समजले. मोबाईलवरूनही त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. समाजमाध्यमांवरही त्यांच्याकडून या घटनेबद्दल काही प्रसारित करण्यात आलेले नाही.

Web Title: The Minister of State for Transport did not react to the Swargate atrocity case because

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.