मेट्रोचा प्रवास आनंददायी, पोटातलं पाणीही हललं नाही..!
By श्रीकिशन काळे | Updated: December 27, 2024 18:40 IST2024-12-27T18:38:02+5:302024-12-27T18:40:00+5:30
महामेट्रोचा प्रवास मात्र दिव्यांगांसाठी अतिशय सहज आणि सोपा झाला आहे. कुठेही कसलीच अडचण येत नाही.

मेट्रोचा प्रवास आनंददायी, पोटातलं पाणीही हललं नाही..!
पुणे : ‘मेट्रोमधून प्रवास करायची माझी खूप इच्छा होती. ती इतक्या सहज, सुंदररीत्या होईल, असं वाटलंच नव्हतं. मी व्हीलचेअरवर असल्याने हा प्रवास कसा होईल ? याबाबत साशंक होते. पण, मंडई मेट्रो स्थानकात गेले आणि सुरुवातीपासून मला तिथल्या कर्मचाऱ्यांनी योग्य मार्गदर्शन केले. त्यामुळे मी मेट्रोत बसून छान प्रवास केला. पोटातले पाणी देखील हललं नाही, इतका सहजरीत्या प्रवासाचा आनंद मेट्रोने दिला’, अशा भावना पॅरा ऑलिम्पिक स्वीमर तृप्ती चोरडिया हिने व्यक्त केल्या.
शहरामध्ये वाहतूक कोंडी प्रचंड वाढली असल्याने प्रवास करणे कठीण आणि अवघड झाले आहे. त्यातही एका व्हीलचेअरवर असणाऱ्या व्यक्तीस तर त्याहून कठीण होऊन बसते. पण, महामेट्रोचा प्रवास मात्र दिव्यांगांसाठी अतिशय सहज आणि सोपा झाला आहे. कुठेही कसलीच अडचण येत नाही. एकटे देखील मेट्रोमध्ये जाऊन प्रवास करू शकतात. त्याचाच अनुभव तृप्ती चोरडिया हिने घेतला.
तृप्ती म्हणाली, खूप दिवसांपासून मला मेट्रोमधून प्रवास करायचा होता. त्यामुळे मी रिक्षात बसून स्वारगेट मेट्रो स्थानकाकडे गेले. पण, तिथे पार्किंगची अडचण असल्याने मी मंडई मेट्रो स्थानकाकडे गेले. तिथे गेल्यानंतर सुरुवातीला आत गेले की, लगेच तिथले कर्मचारी माझ्याकडे आले. त्यांनी मला तिकीट कसे काढायचे ? कुठून कसे जायचे ? याविषयी माहिती दिली. माझ्यासोबत तिथल्या कर्मचाऱ्यांनी येऊन मेट्रोमध्ये बसवले. मेट्रोमध्ये जाताना कुठेही कसलाच अडथळा आला नाही. मी पिंपरीकडे जाणाऱ्या मेट्रोत बसले. कर्मचाऱ्यांनी मला एका ठिकाणी व्हीलचेअर लॉक करून ठेवायला सांगितले आणि खांबाला पकडले. मेट्रो सुरू झाल्यावर माझी व्हीलचेअर इकडे-तिकडे हलेल असं वाटलं होतं. पण, व्हीलचेअर अजिबात हलली नाही आणि इतकंच नव्हे तर पोटातील पाणी देखील हललं नाही. त्यामुळे एवढा छान प्रवास झाला की, माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. मग पिंपरीत उतरले आणि तिथून परत येण्यासाठी तिकीट काढले आणि मेट्रोत बसले. पहिल्यांदा मेट्रोतून वरून शहर पाहत होते. सर्वत्र इमारती, झाडांची हिरवळ पाहायला खूप मजा आली.
दिव्यांग किंवा ज्येष्ठांना अतिशय चांगली सोय मेट्रोने केली आहे. त्यामुळे मला प्रवास करताना खूप आनंद झाला. शहरात प्रवास करताना खूप त्रास होतो. पण, मेट्रोमध्ये काहीच अडथळा आला नाही. - तृप्ती चोरडिया, पॅरा ऑलिम्पिक स्वीमर