फळांचा राजा महागला; उत्पादनात ७० टक्के घट, गुढीपाडव्याला हापूसचा तुटवडा, १ डझनाचा रेट किती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 15:59 IST2026-03-17T15:55:29+5:302026-03-17T15:59:22+5:30
पुणे मार्केटयार्डात दररोज २ ते ३ हजार हापूस पेट्या दाखल होत असतात, यंदा परिस्थिती पूर्णपणे वेगळी असून सध्या केवळ १५० ते २०० पेट्यांचीच आवक होत आहे

फळांचा राजा महागला; उत्पादनात ७० टक्के घट, गुढीपाडव्याला हापूसचा तुटवडा, १ डझनाचा रेट किती?
पुणे: मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदाचा हापूस आंबा हंगाम अस्थिर असल्याचे चित्र मार्केटयार्ड बाजारात दिसत आहे. हवामानातील सातत्याने बदलणारे स्वरूप, परतीच्या पावसाचा परिणाम तसेच थ्रिप्स आणि तुडतुड्या (हॉपर) या किडींच्या प्रादुर्भावामुळे कोकणातील आंबा उत्पादनात तब्बल ६० ते ७० टक्क्यांची घट झाल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. यामुळे यंदा आंबा बागायतदार संकटात सापडले आहेत. त्यामुळे यंदा पाडव्याच्या मुहूर्तावर हापूसचा तुटवडा भासणार आहे. मात्र यंदा परिस्थिती पूर्णपणे वेगळी असून सध्या मार्केटयार्डात केवळ १५० ते २०० पेट्यांचीच आवक होत आहे. (दि.१९) मार्चला गुढीपाडवा असल्याने बाजारात तयार आंब्याची मागणी वाढली असली तरी पुरवठा कमी असल्याने दरात मात्र वाढ झाली आहे. बाजारात एक डझनला दिड हजार ते ३ हजार ५०० रूपयांपर्यत पोहचला आहे. सामान्य गरिबांना आंबा चव चाखण्यासाठी अक्षय्य तृतीयेपर्यंत वाट पाहवी लागणार आहे.
यंदा कोकणात पावसाचे प्रमाण जास्त राहिल्यामुळे जमिनीत दीर्घकाळ ओलावा टिकून राहिला. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ऑक्टोबरपर्यंत वातावरण थंड राहिल्याने आंब्याच्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणात मोहोर आला. प्रारंभीच्या टप्प्यावर हंगाम चांगला राहील, अशी अपेक्षा बागायतदारांना होती. मात्र त्यानंतर हवामानात अचानक बदल झाला. तापमानातील चढ-उतार आणि दमट वातावरणामुळे मोहोरावर परिणाम झाला आणि मोठ्या प्रमाणात वांजमोहोर दिसून आला. परिणामी अपेक्षित फळधारणा झाली नाही. त्यातच कोकणात थ्रिप्स आणि तुडतुड्या किडींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. या किडी मोहोर आणि कोवळ्या फळांवर हल्ला करतात. त्यामुळे मोहोर गळून पडणे, फळांची वाढ खुंटणे आणि गुणवत्तेत घट होणे अशा समस्या निर्माण झाल्याने बागांमध्ये फळधारणा टिकल नाही. परिणामी यंदा केवळ ३० ते ४० टक्के उत्पादन घटले आहे. याचा हापूर आंब्यावर परिणाम झाला आहे.
मार्केटयार्डात १५० ते २०० पेट्यांची आवक
गेल्या वर्षी १० ते १५ मार्च दरम्यान पुणे मार्केटयार्डात दररोज दोन ते तीन हजार हापूस पेट्या दाखल होत असतात. यंदा परिस्थिती पूर्णपणे वेगळी असून सध्या केवळ १५० ते २०० पेट्यांचीच आवक होत आहे.
कोकणातील अनेक भागांत फेब्रुवारी-मार्चमध्ये पडलेले हलके पावसाचे शिंतोडे आणि वातावरणातील आर्द्रता यामुळे उरलेल्या फळांवरही परिणाम झाला आहे. काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेमुळे फळगळ झाली असल्याचे गावखडी, रत्नागिरी येथील शेतकरी मंदार कदम यांनी सांगितले.
यंदा बदलते हवामान तसेच तुडतुड्या आणि थ्रिप्स रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. दरवर्षीच्या तुलनेत केवळ ३० ते ४० टक्के उत्पादन हाती लागले आहे. त्यामुळे दर तेजीत राहण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत आवक वाढेल असा अंदाज आहे.” — करण जाधव, आंबा व्यापारी, मार्केटयार्ड
गेल्या २० वर्षांत प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात आंब्याचा तुटवडा जाणवत आहे. यंदा गुढीपाडव्याला हापूस आंब्याचे डझनाचा दर दीड ते चार हजार रुपये डझनापर्यंत जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी पेटीला सहा हजार रुपये भाव होता.” — अरविंद मोरे, आंबा व्यापारी, मार्केटयार्ड