नागरिकांचे प्रश्न सोडवणे हे सरकारचे काम, त्याचा वेगळा अर्थ काढू नये, जनसंवाद यात्रेत अजितदादांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 16:49 IST2025-09-13T16:49:03+5:302025-09-13T16:49:32+5:30
या कार्यक्रमाशी थेट संबंध नसला तरी आदेश आल्यानंतर यावेच लागले अशा दबक्या आवाजात प्रतिक्रिया अधिकारी यावेळी देत होते

नागरिकांचे प्रश्न सोडवणे हे सरकारचे काम, त्याचा वेगळा अर्थ काढू नये, जनसंवाद यात्रेत अजितदादांची प्रतिक्रिया
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांच्या समस्यांची जाणून घेण्यासाठी जनसंवाद यात्रा सुरू केली खरी, मात्र यासाठी प्रशासनातील तब्बल ३० विभागांच्या प्रमुखांनाच अक्षरश: वेठीस धरण्यात आले. कार्यक्रम पक्षाचा मात्र, महापालिका, जिल्हा प्रशासनापासून संबंध सरकारी यंत्रणा दावणीला बांधण्यात आली. हडपसर मतदारसंघातील समस्यांशी आमचा काय संबंध? मात्र, आदेश निघाले आणि आम्हाला हजर राहावे लागले अशी दबक्या आवाजात प्रतिक्रिया अनेक अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, हे सरकारचे काम आहे, सध्या नागरिकांची प्रश्न सोडवत आहे. त्याचा वेगळा अर्थ काढू नये, अशी प्रतिक्रिया पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
महापालिका निवडणुका स्वबळावर लढविण्याचे संकेत यापूर्वीच अनेकदा दिले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पवार यांनी हडपसर मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शनिवारी राष्ट्रवादी जनसुनावणी ठेवण्यात आली होती. या समस्या सोडविण्यासाठी पवार व्यक्तीश: लक्ष घालणार असल्याची जाहिरात सर्वत्र केल्याने नागरिकांनी या सुनावणीला मोठी गर्दी केली होती. या जनसुनावणीसाठी पवार यांच्या मुंबईच्या कार्यालयातून जिल्हा प्रशासनाला संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती बंधनकारक असल्याचे पत्र काढण्यात आले. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने तब्बल ३० विभागांना आपल्या प्रमुखांसह अन्य अधिकाऱ्यांना या पक्षाच्या जनसुनावणीला उपस्थित राहण्याचे फर्मान सोडले.
यावेळी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे व्यासपीठावरच अजित पवार यांच्या शेजारी बसलेले होते. मात्र, आमदार चेतन तुपे आणि अन्य पदाधिकारी मात्र, नागरिकांच्या गर्दीचे व्यवस्थापन करत होते. सर्व ३० विभागांचे अधिकारी सभागृहात उपस्थित होते. या समस्यांमध्ये सांडपाणी व्यवस्था, रस्ते, पाणीपुरवठा, कचरा तसेच काही वैयक्तिक स्वरूपाच्या समस्या होत्या. यातील बहुतांश पालिका स्तरावरील असल्याने महापालिका प्रशासनाची उपस्थिती समजू शकणारी होती.
विविध विभागांचे प्रमुख उपस्थित
मात्र, जिल्हा परिषद, पिंपरी चिंचवड पोलिस, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभागाचा राष्ट्रीय महामार्ग विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाचा पूर्व भाग, पीएमआरडी, महावितरण, राज्य रस्ते मार्ग परिवहन, एमआयडीसी, राज्य रस्ते विकास महामंडळ, मत्स्य विभाग, भूमी अभिलेख, विभागीय पर्यटन कार्यालय, कृषी विभाग, अन्नधान्य वितरण अधिकारी, जिल्हा क्रीडाधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुरातत्त्व विभाग, जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जलसंपदा विभाग खडकवासला प्रकल्प, पाटबंधारे विभाग, उपविभागीय अधिकारी हवेली, तहसीलदार हवेली, गटविकास अधिकारी जिल्हा परिषद आदी विभागांचे बहुतांश विभागप्रमुख तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
थेट संबंध
मुळात हा कार्यक्रम पक्षाशी संबंधित होता. तसेच हा मतदारसंघ शहरी असल्याने मुख्यत्वे शहराशी आणि पालिकेशी संबंधित नागरिकांच्या समस्या असल्याने अन्य विभागांचा काहीही संबंध नसल्याने या सर्व अधिकाऱ्यांना जवळपास पाच तास कार्यक्रमस्थळी तिष्ठत राहावे लागले. थेट संबंध नसला तरी आदेश आल्यानंतर यावेच लागले अशा दबक्या आवाजात प्रतिक्रिया अधिकारी यावेळी देत होते.
मी राज्य सरकारचा उपमुख्यमंत्री म्हणून येथे बसलो आहे. हे सरकारचे काम आहे, सध्या नागरिकांची प्रश्न सोडवत आहे. सगळे अधिकारी येथे आहेत. आम्हाला सगळ्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत. या अधिकाऱ्यांची ती जबाबदारी आहे. पालकमंत्री म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे. वेगळा अर्थ काढू नका. - अजित पवार, उपमुख्यमंत्री