होणारा नवरा पसंत नव्हता; नवरीने दिली दीड लाखांची सुपारी, यवत पोलिसांनी उघडकीस आणला कट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 17:31 IST2025-04-01T17:30:18+5:302025-04-01T17:31:54+5:30
दोघांचे प्री-वेडिंग शूट झाल्यानंतर दौंडमध्ये काही जणांनी नवऱ्याला अडवून मारहाण केली होती

होणारा नवरा पसंत नव्हता; नवरीने दिली दीड लाखांची सुपारी, यवत पोलिसांनी उघडकीस आणला कट
यवत : होणारा नवरा पसंत नसल्याने नवरी मुलीने त्याला जिवे ठार मारण्याची सुपारी देऊन हल्ला घडवून आणल्यानंतर यवत पोलिसांनी याचा तपास करून सदर कट उघडकीस आणला आहे.
दि. २७ फेब्रुवारी २०२५ रोजी सागर जयसिंग कदम (वय - २८, रा. माहिजळगाव, ता.कर्जत, जि.अहिल्यानगर) हा त्याची होणारी बायको मयुरी सुनील दांडगे (रा श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर) हिला प्री-वेडिंग शूट झाल्यानंतर तिच्या मावशीच्या घरी खामगाव येथे सोडून परत जात होता. खामगाव (ता.दौंड) गावच्या हद्दीतील साई मिसळ समोर अज्ञात इसमांनी त्याला अडवून त्याच्या गाडीतून खाली उतरवून मयुरी हिच्याबरोबर लग्न केल तर तुला दाखवितो असे म्हणून लाकडी दांडक्याने मारहाण केली होती. याबाबत गुन्हा यवत पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी दि. २८ मार्च २०२५ रोजी संशयित आरोपी आदित्य शंकर दांडगे (वय १९, रा.गुघलवडगाव , ता.श्रीगोंदा) याच्याकडे चौकशी केली. त्याने मयुरी दांडगे व संदीप दादा गावडे यांच्या सांगण्यावरून मयुरीला होणारा नवरा पसंत नसल्याने दीड लाख रुपयांची सुपारी घेऊन आदित्य याच्यासह आरोपी शिवाजी रामदास जरे (रा.पिंपळगाव पिसा, ता. श्रीगोंदा) इंद्रभान सखाराम कोळपे (वय ३७), सूरज दिगंबर जाधव (वय ३६, रा काष्टी, ता.श्रीगोंदा) यांनी मारहाण केली असल्याची कबुली दिली.
पोलीस तपासात आरोपी मयुरी दांडगे, आदित्य दांडगे, संदीप गावडे शिवाजी जरे, इंद्रभान कोळपे, सूरज जाधव यांनी कट करून फिर्यादी सागर कदम यास जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण केल्याचे समोर आले आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, आरोपी मयुरी अद्याप फरारी असून, इतर सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, गुन्ह्यात वापरण्यात आलेली पांढऱ्या रंगाची कारदेखील पोलिसांनी जप्त केली आहे.