Video: तुकोबांच्या पालखी सोहळ्यात रंगले पहिले अश्व रिंगण; लाखो वैष्णव विठुरायाच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 10:10 IST2025-06-28T10:07:50+5:302025-06-28T10:10:45+5:30

पालखी सोहळ्यात टाळ-मृदुंगाचा होणारा गजर आणि विठुनामाचा जयघोषाबरोबरच लहान-थोरांच्या दांडग्या उत्साहाने भव्यता उत्तरोत्तर वाढविली

The first horse race took place during the palanquin ceremony of Tukoba; Lakhs of Vaishnavas visited Vithuraya | Video: तुकोबांच्या पालखी सोहळ्यात रंगले पहिले अश्व रिंगण; लाखो वैष्णव विठुरायाच्या भेटीला

Video: तुकोबांच्या पालखी सोहळ्यात रंगले पहिले अश्व रिंगण; लाखो वैष्णव विठुरायाच्या भेटीला

लासुर्णे (इंदापूर) : जगद्‌गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले अश्व रिंगण बेलवाडी (ता. इंदापूर) येथे शनिवारी (दि. 28) उत्साहात पार पडले. पालखी सोहळ्यातील अश्व रिंगण सोहळा हा वारकरी भाविकांसाठी त्यांचे देहभान विसरवणारा, सावळ्या विठूच्या चरणी लीन करणारा, शीण घालविणारा, चैतन्याचा झरा असतो.

या सोहळ्यात टाळ-मृदुंगाचा होणारा गजर आणि विठुनामाचा जयघोषाबरोबरच लहान-थोरांच्या दांडग्या उत्साहाने भव्यता उत्तरोत्तर वाढविली. सणसर येथील मुक्कामानंतर भल्या सकाळीच पालखी सोहळ्याने बेलवाडीच्या दिशेने प्रस्थान ठेवले. त्यानंतर भाविकांचे स्वागत, सत्कार स्वीकारत पालखी सोहळा बेलवाडीत दाखल झाला. ग्रामस्थांनी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.

अश्व रिंगण सोहळ्याची सुरुवात अक्षय मचाले यांच्या मानाच्या मेंढ्यांच्या रिंगणाने झाली. यानंतर टाळकरी, वीणेकरी, तुळशी वृंदावनधारक महिला, झेंडेकरी,  यांचे रिंगण पार पडले. यावेळी विठ्ठल भेटीच्या ओढीने निघालेल्या वारकऱ्यांनी वयोभान विसरून धावत या सोहळ्यात रिंगण पूर्ण केले. यावेळी सर्वांनी अलिखित शिस्तबद्ध रिंगण सोहळ्याचे अभूतपूर्व असे दर्शन घडविले. डोळ्याचे पारणे फेडणारा हा सोहळा अनुभवण्यासाठी परिसरातील भाविकही मोठ्या संख्येने हजर होते.

सकाळी ७ वाजल्यापासूनच रिंगण सोहळ्याला पहिल्या अश्व रिंगणासाठी बेलवाडी येथे 'ज्ञानोबा माउली तुकाराम' अशा जयघोषात आगमन झाले. तत्पूर्वी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते बेलवाडीतील पहिल्या मानाच्या गोल रिंगणाच्या अश्वाचे पूजन करण्यात आले. रिंगण सोहळ्यानंतर येथील हनुमान मंदिरामध्ये पालखी सोहळा विश्रांतीसाठी विसावला. यानंतर पालखी सोहळा निमगाव केतकी येथील मुक्कामी मार्गस्थ झाला. यावेळी भाजी, पिठलं, चटणी, ठेचा भाकरीचा आस्वाद घेऊन काही काळ वारकरी भाविकांनी बेलवाडीत विसावा घेतला. घरोघरी वारकरी भाविकांचा पाहुणचार करण्यात आला. वारकरी भाविकांच्या भेटीने जणू विठ्ठल दर्शनाचाच आनंद येथील ग्रामस्थांना झाल्याचे जाणवत होते.

Web Title: The first horse race took place during the palanquin ceremony of Tukoba; Lakhs of Vaishnavas visited Vithuraya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.