निवडणूक आयोग ठरविणार तलाठ्यांची नेमणूक, पुण्यात २३३ नवे तलाठी येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 10:28 AM2024-03-21T10:28:40+5:302024-03-21T10:28:55+5:30

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर आठवडाभरात संबंधितांची नेमणूक करण्यात येईल

The election commission will decide the appointment of talathis 233 new talathis will come in Pune | निवडणूक आयोग ठरविणार तलाठ्यांची नेमणूक, पुण्यात २३३ नवे तलाठी येणार

निवडणूक आयोग ठरविणार तलाठ्यांची नेमणूक, पुण्यात २३३ नवे तलाठी येणार

पुणे : तलाठी भरतीची निवड यादी जाहीर झाल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी पूर्ण केलेल्या उमेदवारांना नियुक्तीसाठी प्राधान्यक्रम भरून देण्याची प्रक्रिया सुरू आहे. या उमेदवारांना नेमणूक देण्यासंदर्भात राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून, राज्य सरकारने हा प्रस्ताव केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवला आहे. आयोगाच्या मान्यतेनंतर या उमेदवारांना जिल्हानिहाय नेमणूक देण्यात येणार आहे. त्यामुळे या भरती झालेल्या तलाठ्यांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. पुणे जिल्ह्यात अशा २३३ उमेदवारांना तलाठी म्हणून नेमणूक मिळणार आहे.

राज्यभरातील तलाठी भरतीच्या निवड यादीनंतर उमेदवारांची कागदपत्रांची तसेच बायोमेट्रिक पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या मान्यतेनुसार पुणे जिल्ह्यात ३८५ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. पेसा अर्थात आदिवासीबहुल क्षेत्रातील १५ जागा वगळता जिल्ह्यासाठी ३६८ उमेदवार नेमणुकीसाठी पात्र ठरले आहेत. अनुसूचित जातीतील माजी सैनिकांसाठी राखीव असलेला २ जागांवर उमेदवार न मिळाल्याने या जागा भरण्यात येणार नाहीत. या जागांसंदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडे पदभरतीसाठी मान्यतेचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. विभागाने मान्यता दिल्यानंतर या २ जागा दुसऱ्या संवर्गातून भरण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी सांगितले.

दरम्यान ३६८ पैकी ३३० जणांनी कागदपत्रांची पडताळणी पूर्ण केली आहे. त्यातील खुला प्रवर्ग व महिला प्रवर्गातून २३३ जणांना नेमणूक देण्यात येणार आहे. अन्य उमेदवारांच्या समांतर आरक्षणाची पडताळणी करून त्यांनाही नेमणूक देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या २३३ जणांमध्ये १२२ जण खुल्या प्रवर्गातील तर १११ महिला प्रवर्गातील उमेदवार आहेत.

तलाठ्यांच्या नेमणुकीसंदर्भाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. मात्र, सध्या आचारसंहिता लागू असल्याने या नेमणुका करण्यासाठी राज्य सरकारने हा प्रस्ताव केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठविला आहे. आयोगाच्या मान्यतेनंतर या नेमणुकांचा मार्ग मोकळा होणार आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वीच ही प्रक्रिया सुरू झाली असल्याने नेमणुकीबाबत अडचण येणार नाही असेही सूत्रांनी स्पष्ट केले. त्यामुळे निवडणुकीच्या काळात जिल्ह्यात सुमारे २३३ तलाठी नियुक्त केले जातील.

नेमणुकीसंदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर आठवडाभरात संबंधितांची नेमणूक करण्यात येईल. - ज्योती कदम, निवासी उपजिल्हाधिकारी, पुणे

Web Title: The election commission will decide the appointment of talathis 233 new talathis will come in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.